गारपीटग्रस्तांना सरकारी मदत तुटपुंजी -मुंडे

March 20, 2014 4:59 PM0 commentsViews: 827

567_munde_sot20 मार्च : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारन दिलेल्या पॅकेजवर आता विरोधकांनी आक्षेप घेतला. दर हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत म्हणजे प्रति चौरस फूट 10 पैसे इतकी मदत आहे, ही मदत अतिशय तुटपुंजी आहे आणि शेतकर्‍यांची थट्टा उडवणारी आहे अशी टीका भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळानं गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी 4 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. पण निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतरच ही मदत देता येणार आहे. महायुतीचे हातकणंगले मतदार संघातील उमेदवार राजू शेट्टी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्यासह आरपीआयचे नेते रामदास आठवले, शिवसेना नेते दिवाकर रावते हे नेते उपस्थित होते.

शरद पवार हे आता कर्जमाफीमध्ये सरकारचा संबंध नसल्याचं म्हणतात तर मग 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी कुणी केली असा सवालही मुंडेंनी विचारलाय. तसंच पुण्याच्या जागेबाबत बोलतना त्यांनी मी कुणासाठीही आग्रही नसल्याचं सांगत या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या राज्यात 12 सभा होणार असल्याची माहितीही मुंडे यांनी दिलीय. तसंच सांगलीच्या जागेबाबत संभाजी पवारांना मी भेटणार असून तिथं संजयकाका पवार हे योग्य उमेदवार असल्याची प्रतिक्रियाही मुंडेंनी दिलीय. दरम्यान शेट्टी आणि आठवलेंनीही सरकारने दिलेलं पॅकेज पुरेसं नसल्याची प्रतिक्रिया दिलीय. दरम्यान, शेतकर्‍यांना भरगोस मदत मिळावी, यासाठी विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी आज दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज म्हणजे धुळफेक आहे, अशी टीका त्यांनी केलीय.

close