काळा आठवडा, उस्मानाबाद-जळगावमध्ये 17 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

March 22, 2014 3:24 PM0 commentsViews: 352

farmer suicide22 मार्च : गारपीटग्रस्तांसाठी राज्य सरकारने 4 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे पण गारपिटीच्या नुकसानीमुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत 7 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहे तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांत 10 शेतकर्‍यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

उस्मानाबादमधल्या कळंब तालुक्यामध्ये रत्नाकर माळी या शेतकर्‍यानं गळफास लावून आत्महत्या केली. मत्साखंडेश्वरी गावातली ही घटना आहे. गारपिटीमुळे माळी यांच्या हरभरा,ज्वारी या पिकांचं नुकसान झाले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील ही 7 वी आत्महत्या आहे.

जालन्यात शेतकर्‍याची आत्महत्या

जालन्यातही एका गारपीटग्रस्त आणि कर्जबाजारी अल्प भूधारक शेतकर्‍यानं आत्महत्या केली. 40 वर्षांच्या कडूबा सपकाळ यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगी गावातली ही घटना आहे. सपकाळ यांच्यावर आधीच बँकेचं कर्ज होतं. त्यातच गारपिटीमुळे त्याचं पावणे दोन एकर शेतही उध्वस्त झालं. त्यामुळे निराश होऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं.

जळगावात काळा आठवडा

जळगाव जिल्ह्यात गेला आठवडा काळा आठवडा ठरलाय. कारण गारपिटीनं उध्वस्त झालेल्या 10 शेतकर्‍यांनी गेल्या 8 दिवसांत आत्महत्या केली आहे. अमळनेर तालुक्यात गलवाडे खुर्द इथल्या अनुसयाबाई पाटील यांनी विहिरीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय. अनुसया पाटील यांच्या पती गेले 10 वर्ष पॅरेलिसीसनं आजारी आहेत. त्यामुळे त्याच शेती सांभाळत होत्या. तर भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावातल्या हेमराज पाटील यांनी ट्रेनखाली आत्महत्या केलीये. हेमराज पाटील यांनी 2 लाखाचं कर्ज घेऊन वांग्याची लागवड केली होती. पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाल होतं.

close