सुट्टी संपली, संजय दत्त जेलमध्ये दाखल

March 22, 2014 4:08 PM0 commentsViews: 1253

sanjay dutt in jail22 मार्च : 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अभिनेता संजय दत्त दोन महिन्यांची पॅरोल सुट्टी संपवून येरवडा तुरंगात दाखल झाला आहे. संजय दत्तच्या पॅरोलची आज मुदत संपलीय. त्यामुळे त्याला जेलमध्ये दाखल व्हावं लागलंय.

येरवडा तुरुंगात जाण्यासाठी संजय दत्त आज सकाळी आपल्या वांद्रे इथल्या घरातून निघाला. दुपारी कुटुंबीयांचा निरोप घेऊन संजूबाबा जेलमध्ये दाखल झालाय. 1993 बॉम्बस्फोटात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आलं. या प्रकरणी त्याला पाचवर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या अगोदर संजयने 18 महिन्यांची शिक्षा भोगली आहे.

उर्वरीत शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्तची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. मात्र वारंवार सुट्टी घेतल्यामुळे संजय चर्चेत राहिला. संजय दत्त येरवडा तुरूंगात दाखल झाल्यानंतर आठ महिन्यात 4 वेळा सुट्टीवर बाहेर आला.21 डिसेंबर 13 रोजी संजय महिन्याभराच्या सुट्टीवर बाहेर आला.

त्यानंतर 20 जानेवारी 14 ला पत्नी मान्यताच्या प्रकृती ठीक नसल्यामुळे तिच्या उपचारासाठी सोबत राहावं म्हणून त्यांच्या सुट्टीमध्ये महिनाभराची वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 18 फेब्रुवारी 14 रोजी पॅरोलमध्ये आणखी 30 दिवसांची वाढ करण्यात आली होती. आता पॅरोल आणि फर्लो सुट्टीची मर्यादा संपली असून वर्षभर संजूबाबाला जेलमध्येच राहावे लागेल.

संजूबाबाच्या सुट्‌ट्या

- 21 मे 2013 : संजय दत्त येरवड्यात
- 1 ऑक्टोबर 2013 : 14 दिवसांची रजा (फर्लो)
- 14 ऑक्टोबर 2013 : फर्लोमध्ये 14 दिवसांची वाढ
- 21 डिसेंबर 2013 : 1 महिन्याची सुट्टी
- 20 जानेवारी 2014 : महिनाभराची वाढीव सुट्टी
- 18 फेब्रुवारी 2014 : पॅरोलमध्ये 30 दिवसांची वाढ