का राजकारणी टाळतायेत गावातले प्रचार दौरे!

March 25, 2014 1:10 PM0 commentsViews: 785

प्रवीण मुधोळकर, नागपूर
25 मार्च :  गारपीटग्रस्त भागात शेतकरी प्रचारांमध्ये सहभागी होण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. जगायचं कसं असा प्रश्न त्यांना पडलाय. हेच प्रश्न ते प्रचारासाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना विचारतायत.

गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागात लोकांचा निरुत्साह जाणवतोय. उभं पीक आडवं झाल्यामुळे राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे शेतकरी निवडणुकीबद्दल विचारही करण्याच्या स्थितीत नाहीये.

गेल्या वर्षी ओला दुष्काळ आणि त्यानंतर गारपिटीचं अस्मानी संकट..! सलग दोन वर्षं ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. राज्यातल्या 20 लाख हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसलाय, तर ग्रामीण भागात, एकट्या विदर्भात 3 हजार घरांचं नुकसान झालं आहे. राज्यात निवणुकीचे पडघम वाजत असले तरी ग्रामीण भागात मात्र निवडणुकींचा गाजावाजा दिसत नाहीये.

सरकारनं मदत तर जाहीर केलीये, पण ही मदत पीडित शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नसल्यानं राजकीय पक्षांचे नेतेही ग्रामीण भागात यायला टाळाटाळ करतायत.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे ग्रामिण भागातील शेतकरी अडचणीत आहे. राजकीय पक्षांची कार्यालयेही ओस पडली आहेत.

खरं तर निवडणूका आल्या की ग्रामीण भागात प्रचाराला एक वेगळा रंग चढतो, पण गारपिटीच्या संकटामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा या भागांत प्रचाराला न गेलेलंच बरं असा पवित्रा राजकीय पक्षांनी घेतलाय.

close