वाराणसीत केजरीवाल यांच्यावर शाईफेक

March 25, 2014 4:03 PM0 commentsViews: 2322

BjkIZllCMAEpIJB25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीच्या आखाड्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी आज (मंगळवारी) आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल वाराणसीत दाखल झाले.

केजरीवाल वाराणसीच्या जनतेचा कौल घेऊन आपण लढणार की नाही जाहीर करणार आहे. मात्र केजरीवाल यांच्यावर अंडे आणि काळी शाई फेकण्यात आली. केजरीवाल यांनी वाराणसीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. या रॅली दरम्यान केजरीवाल यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली.

यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, त्या अगोदर केजरीवाल आणि मोदी समर्थक आज आमनेसामने आले. केजरीवाल काशी विश्वनाथ मंदिरात दर्शनाला जात होते. त्यावेळी मोदी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी केजरीवाल यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी अंडी फेकली.

गंगेत लावली डुबकी

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत आल्यानंतर काही वेळातच गंगेत स्नान केलं. आपली मोहीम यशस्वी करण्यासाठी गंगेचे आशीर्वाद घ्यायला आलोय असं यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं. केजरीवाल यांच्या वाराणसी दौर्‍याविषयी मोठी उत्सुकता आहे. आज दुपारी ते जाहीर सभेत भाषण करणार आहेत. त्यावेळी ते वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची घोषणा करतील का याविषयी उत्सुकता आहे.

close