प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी करणार आंदोलन

March 18, 2009 2:50 PM0 commentsViews: 7

18 मार्च, मुंबई रोहणी गोसावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या बीएएमएस डॉक्टरांना काढून टाकण्याचे आदेश आरोग्य खात्यानं दिले आहेत. या बीएएमएस डॉक्टरांच्या जागेवर नवीन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. या वैद्यकीय अधिकार्‍यांनी आरोग्य भवनात येऊन संचालकांची भेट घेतली. पण त्यांना काहीही उत्तर मिळालं नाही. त्यामुळं आता त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आरोग्य खात्याच्या या निर्णयाचा फटका डॉ. प्रवीण सोनावणे यांच्यासारख्या बीएएमएस डॉक्टरांना बसलाये. अंबोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे डॉ. सोनावणेआपल्याला पुन्हा कामावर रूजू करून घ्यावं या मागणीसाठी आले होते. ते बीएएमएस डॉक्टर आहेत, पण त्यांना आता सेवामुक्त केलं आहे. म्हणजे कामावरून काढून टाकलं आहे आणि त्यांच्या जागी एमबीबीएस डॉक्टरची नेमणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या बेरोजगारीची वेळ आली आहे.डॉ. सोनवणेंबरोबर 80 डॉक्टर हीच मागणी घेऊन आरोग्य भवनात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 1200 बीएएमएस डॉक्टर सरकारी सेवेत आहेत. आणि त्यांच्यापैकी आता जवळपास 700 डॉक्टरांना काढलं जाणार आहे. ज्या डॉक्टरांना सेवामुक्त केलं आहे त्यांच्या जागी दुसर्‍या नियुक्तीची जबाबदारी त्या त्या विभागाच्या सहसंचालकांना देण्यात आली होती. पण सहसंचालकांनी त्यांची जबाबदारी झटकली आहे. " या संदर्भात ठाणे विभागाचे सहसंचालक के.जी. देशमाने यांना विचारलं असता त्यांनी मुख्य संचालकांना भेटण्यास सांगितलं. खरं तर जिल्हा परिषदेच्या या प्राथमिक केंद्रांवर दोन वैद्यकीय अधिकारी असतात. त्यातला एक एमबीबीएस डॉक्टर आणि एक बीएएमएस डॉक्टर असावा असा नियम आहे. पण या बीएएमएस डॉक्टरांना काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागेवरही एमबीबीएस डॉक्टरांचीच नेमणूक करण्यात आली होती.ग्रामीण आणि आदिवासी भागात जेव्हा कोणी काम करायला तयार नव्हतं तेव्हा या डॉक्टरांनी तिथं काम केलंय.पण आता एमबीबीएस डॉक्टरांची नेमणुक करण्यात आल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात येतं आहे. म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो अशी भूमिका या डॉक्टरांच्या बाबतीत घेण्यात आली आहे. 20 तारखेपर्यंत जर नेमणूक केली गेली नाही, तर सर्व डॉक्टर आमरण उपोषणाला बसतील असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.

close