सेनेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, कदमांना प्रचारबंदी

March 26, 2014 4:29 PM0 commentsViews: 2778

ramdas kadam_news26 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना ‘मातोश्री’वरूनच प्रचारात न उतरवण्याची भूमिका घेण्यात आल्याचा दावा शिवसेनेचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी केला आहे.

गुहागरमध्ये झालेल्या प्रचार सभेत गीतेंच्या या वक्तव्यामुळे रामदास कदमांच्या कार्यकर्त्यांत संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. पण, मला पक्षप्रमुखांनी राज्यभर निवडणुकीचा प्रचार करण्याचे निर्देश दिले आहे असं स्पष्टीकरण रामदास कदम यांनी दिलंय. गेल्याच आठवड्यात रामदास कदमांनी अनंत गीतेंचा प्रचार आपण करणार नसल्याचं जाहीर वक्तव्य केलं होतं.

गेल्या काही महिन्यांपासून रामदास कदम शिवसेनेत नाराज असल्याचंही बोललं जातंय. पण आपण नाराज नाही असं रामदास कदम यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला राज्यभरात प्रचार करण्यासाठी दौरा करा असं सांगितलं आहे पण दुसरीकडे विनाकारण अशा बातम्या पसरवल्या जात आहे यात अनंत गीतेंचा किती हात आहे. हे मी सांगू शकत नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थिती केली. तसंच आपण शिवसेना सोडणार नाही, मी अफवांना भिक घालत नाही. मला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत आहे असा आरोपही कदम यांनी केला.

close