‘आदर्श’मधून चव्हाणांचं नाव वगळा, पुन्हा सीबीआयची याचिका

March 26, 2014 10:15 PM0 commentsViews: 815

Image img_235672_ashokchavanaadrshscam_240x180.jpg26 मार्च : लोकसभेसाठी आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रिंगणात उतरले आहे तर दुसरीकडे आदर्श प्रकरणी सीबीआयने आज (बुधवारी) हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केलीय.

आदर्श घोटाळ्याच्या एफआयआरमधून अशोक चव्हाण यांचं नाव वगळावं, अशी मागणी यात करण्यात आलीय. सीबीआयने कालच मुंबई हायकोर्टात ही फेरविचार याचिका दाखल केलीय. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांविरोधात फारसे पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांची चौकशी करायला राज्यपालांनी नकार दिला होता. त्यानंतर सीबीआयने एफआयआरमधून चव्हाणांचं नाव वगळण्यात यावं, अशी याचिका लोअर कोर्टात केली होती. पण, कोर्टाने ती फेटाळली होती.

‘आदर्श’ सुटकेसाठी दुसरी संधी

विशेष म्हणजे मध्यंतरी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सूचना केल्यानंतर राज्य सरकारने अहवाल अशंत: स्वीकारला. पण प्रत्यक्षात यामुळे राजकीय नेते वाचले आणि अधिकारी अडकले असंच झालं. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांवरचा लाभासाठी निर्णय घेतल्याचा ठपका स्वीकारण्यात आलाय. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करण्याचा राजकीय निर्णयही सरकारने घेतला. अशोक चव्हाण वगळता इतर पाच राजकीय व्यक्तींविरोधातला कुठलाही ठपका सरकारनं स्वीकारलेला नाही. या राजकीय व्यक्तींवर गुन्हा केल्याचा ठपका आयोगानं ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या चौकशीची गरज नसल्याचं म्हणत सरकारनं या सर्व नेत्यांना अभय दिलं.

या नेत्यांमध्ये केंद्रीय गृमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, राष्ट्रवादीचे सध्याचे कॅबिनेट मंत्री सुनील तटकरे आणि राजेश टोपे यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे राज्यपालांनीही अशोक चव्हाण यांच्यावर कारवाईची परवानगी द्यायला राज्यपाल शंकरनारायन यांनी नकार दिला आहे. सीबीआयने अशोक चव्हाण यांच्याविरोधात खटला दाखल करण्यासाठी राज्यपालांकडे परवानगी मागितली होती.

क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 197 अन्वये माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायचा असेल तर राज्यपालांची पूर्व संमती घ्यावी लागते. आता राज्यपालांनीही नकार दिल्यामुळे अशोक चव्हाण यांचा बाजू भक्कम झाली आहे. कोर्टात सीबीआयची बाजू लक्षात घेऊन कोर्ट का निर्णय देणार यावर अशोक चव्हाण यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कोर्टाने जर क्लीन चिट दिली तरच अशोक चव्हाण यांची आदर्श प्रकरणातून कायमची सुटका होणार आहे.

सोनिया गांधींकडून पाठराखण

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अशोक चव्हाण यांची जोरदार पाठराखण केली. काँग्रेसनं आज निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पत्रकारांनी आदर्श घोटाळ्यात आरोपी असलेले अशोक चव्हाण यांना उमेदवारी कशी काय देण्यात आली, असा सवाल विचारला. त्यावर सोनिया गांधींनी चव्हाणांची बाजू घेतली. चव्हाण हे दोषी नाहीत, कुठल्याही कायद्यांनं त्यांना निवडणूक लढवायला बंदीही घातलेली नाही, असं स्पष्टीकरण सोनिया गांधी यांनी दिलं. त्यामुळे सोनिया गांधी आणि काँग्रेस अशोक चव्हाणांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं स्पष्ट झालं.

close