झाडावर सापडला तरुणाचा मृतदेह

March 26, 2014 9:39 PM0 commentsViews: 2302

news_bhayandar_muder26 मार्च : मुंबई जवळील भाईंदर इथल्या सुभाषचंद्र मैदान परीसरातील एका झाडावर तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडालीय. उत्तन रोड लगत असलेल्या एका झाडाच्या फांदीला एका अज्ञात युवकाचा मृतदेह लटकलेला होता. हे पाहताच परिसरातील रहिवाशांनी पोलिसांना कळवलं. यानंतर भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा मृतदेह नाथा पांडु चव्हाण या युवकाचा असल्याचं समोर आलंय. नाथा हा मुंबई येथील खारगाव येथे राहणारा आहे. तो मंगळवारी रात्री भाईंदर येथील आंबेडकर नगर येथे आपल्या नातेवाईकांकडे आला होता. रात्री जेवणानंतर नाथा कुणालाही न सांगता घराबाहेर निघाला होता. पण सकाळी हा सर्व प्रकार पाहून त्याच्या नातेवाईकांना जबर धक्का बसलाय.

विशेष म्हणजे नाथाचा मृतदेह ज्या स्थितीमध्ये झाडावर लटकलेला होता त्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जातोय. केवळ चार फुटांच्या उंचीवर असलेल्या फांदीला त्याचा मृतदेह लटकलेला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करून मृतदेह झाडावर लटकावला असा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही आत्महत्या असावी पण केवळ चार फुटांच्या उंचीवर मृतदेह लटकलेला आढळ्याने दाट संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी सदर घटनेची नोंद करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणाची उकल होईल असं सांगण्यात आलंय.

close