राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अडले, निलेश राणेंचा प्रचार करणार नाय !

March 27, 2014 7:09 PM0 commentsViews: 4316

ratnagiri_nelish_rane_kokan27 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्गात निलेश राणेंविरोधातला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद आता विकोपाला गेलाय. उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मुलगा आणि आघाडीतर्फे लोकसभेचे उमेदवार असलेले निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

त्यानंतर हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत गेलं आणि निलेश राणे यांचा प्रचार करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आले. पण, तरीही स्थानिक कार्यकर्ते बधले नाही आणि आपला विरोध कायम ठेवला. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तर आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य केलं नाही तर खड्यासारखं बाजूला करू, असा इशाराही दिला. उदय सामंत यांच्या इशार्‍यानंतर सिंधुदुर्गातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले आहे.

आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस मध्येच का विलीन करीत नाही असा सवाल या कार्यकर्त्यांनी विचारलाय. आपल्याला खड्यासारखं बाजूला केलं तरी चालेल मात्र काहीही झालं तरी काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार न करण्यावर आपण ठाम आहोत असं या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय.

पण सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचारात सहभागी व्हावं, असा आदेश राष्ट्रवादीनं काढलाय. त्यामुळे एखाद दुसरा अपवाद वगळता राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्ते प्रचारात सामील होतील असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय.

close