निवडणुकी आल्या घरी, कलंकित नेते आता दारोदारी !

March 27, 2014 10:31 PM0 commentsViews: 1681

Image img_230852_neta345_240x180.jpg27 मार्च : आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या उमेदवारीने देशात पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय ती कलंकीत नेत्यांना मिळणार्‍या तिकीटांची. राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण, अशोक चव्हाणच याला अपवाद नाही तर सर्वच पक्षात कलंकित नेत्यांना उमेदवारी दिलीय.

काँग्रेसचे नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण…चंदीगडचे उमेदवार पवनकुमार बन्सल..भाजपाचे कर्नाटकातल्या शिमोगाचे उमेदवार बी.एस.येड्डीयुरप्पा…वेगवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेले आणि आप-आपल्या पदांवरून पायउतार व्हावं लागलेले हे नेते.. पण, आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होत आहे. त्यांना त्यांच्या पक्षानं तिकीटही दिलंय. पण, आरोपांबाबत विचारलं की त्यांचं एकच उत्तर असतं.. विरोधकांचं कारस्थान…!! काँग्रेसच नाही तर जवळपास प्रत्येक पक्षाने असे कलंकित उमेदवार दिलेत.

भाजप
* भाजपने उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांना हरीद्वारमधून उतरवलंय. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उत्तराखंडमधल्या धरण प्रकल्पांसाठी अनेक नियमबाह्य परवानग्या दिल्या गेल्या आणि त्यांच्या काळात जमिनींचे अनेक गैरव्यवहार झाले, असा आरोप आहे. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही गेली होती.
* उत्तरप्रदेशमध्ये मुझप्फरनगर दंगल भडकावण्याचा आरोप असलेल्या भारतेंदु सिंग यांना बिजनैर लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळालंय.
* तर बिहारच्या वाल्मिकीनगर मतदारसंघातून सतीश दुबे यांना तिकीट दिलंय. या दुबेंवर बँक दरोड्याचा आरोप आहे. चार्जशीटसुद्धा दाखल झालीय.

समाजवादी पक्ष
* मित्रसेन यादव नावाच्या एका डॉनला समाजवादी पक्षानं उत्तरप्रदेशातल्या फैजाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. मित्रसेनवर तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. 5 गुन्ह्‌यांत चार्जशीटसुद्धा दाखल आहे. लूट, दंगल आणि खुनाचा प्रयत्न असे हे गुन्हे आहेत.

बहुजन समाज पक्ष
* कदीर राणा नावाच्या आमदाराला बसपाने मुझफ्फरनगरसाठी तिकीट दिलंय. इथेच अलिकडे झालेली दंगल भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
* पवन पांडे नावाच्या उमेदवाराला सुलतानपूर मधून तिकीट मिळालंय. पांडे हा बाबरी मशीद पाडण्याच्या कटातला आरोपी आहे. सीबीआयने त्याचं चार्जशीटमध्ये नाव घेतलेलं आहे.

राष्ट्रीय जनता दल
* लालूंनीे माधेपुरा मतदारसंघातून पप्पू यादव नावाच्या डॉनला तिकीट दिलंय. सीपीएमचे नेते अजित सरकार यांची हत्या केल्याच्या गुन्ह्याखाली पप्पूने शिक्षाही भोगलीय.

द्रमुक
* 2 जी घोटाळ्यातले आरोपी ए. राजा यांना उमेदवारी मिळालीय.
* भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या दयानिधी मारन यांना चेन्नईमधून तिकीट मिळालंय.

ही यादी इथेच संपत नाही. अजूनही बरीच नावं आहेत. पण, ही यादी जितकी मोठी असेल तितकी राजकारणातल्या शुचितेची चर्चा बोलाचीच कढी होऊन बसेल.

===============================================================

उमेदवारी मिळालेले कलंकित नेते

===============================================================

भाजप
* रमेश पोखरीयाल
माजी मुख्यमंत्री, उत्तराखंड
- धरण प्रकल्पांसाठी नियमबाह्य परवानगीचा आरोप
- जमिनींचे गैरव्यवहाराचे आरोप

* भारतेंदु सिंग
- मुझप्फरनगर दंगल भडकवल्याचा आरोप

* सतीश दुबे
- बँकेवर दरोडा टाकल्याचा आरोप
- चार्जशीट दाखल

समाजवादी पक्ष
* मित्रसेन यादव
- तब्बल 35 गुन्हे दाखल
- 5 गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल
- लूट, दंगल, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे

 बहुजन समाज पक्ष
* कदीर राणा
- मुझफ्फरनगर दंगल भडकवल्याचा आरोप

* पवन पांडे
- बाबरी मशीद पाडण्याच्या कटात सहभागी
- सीबीआय चार्जशीटमध्ये नाव

 राष्ट्रीय जनता दल
* पप्पू यादव
- सीपीएम नेते अजित सरकार यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा

द्रमुक
* ए. राजा
- 2 जी घोटाळ्यात मुख्य आरोपी

* दयानिधी मारन
- भ्रष्टाचाराचे आरोप

close