कारखानदार आणि शेतकरी नेते आमने-सामने

March 28, 2014 10:23 AM0 commentsViews: 822

28 मार्च : पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले आणि माढा हे दोन्ही मतदार संघ सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहेत. या दोन्ही ठिकाणी शुगर लॉबीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आव्हान द्यायचं ठरवलंय. त्यामुळे इथे नेमकी कुणाची सरशी होते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हातकणंगले मधून तर सदाभाऊ खोत हे माढ्यामधून लोकसभा निवडणूक लढवतायत. मात्र त्यांच्यासमोर आहेत ते कारखानदारांचं प्रतिनिधित्व करणारे उमेदवार. हातकणंगलेमधून शेट्टींच्या विरोधात कल्लापाणा आवाडे रिंगणात आहेत. ते राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आहेत. तर माढ्यामध्ये खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील रिंगणात आहेत ते राज्य साखर संघाचे अध्यक्ष आहेत.

शेतकरी संघटनेचे नेते विरुद्ध कारखानदार अशी ही लढाई म्हणजे योगायोग नाहीये. तर शेतकरी चळवळ संपवण्याचं हे षड्‌यंत्र आहे, असं शेट्टींचं म्हणणं आहे.

आपण राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष असल्यामुळे कारखाने हे शेतकर्‍यांच्याच हिताचे आहेत, असं कलाप्पाणा आवाडेंचं म्हणणं आहे.
शेट्टींच्या आंदोलनामुळेच मागण्या मान्य झालेल्या नाहीत, असाही त्यांचा दावा आहे.

राजू शेट्टींच्या आंदोलनाचा खरा फटका बसला तो राष्ट्रवादीला. कारण बहुतांशी साखर कारखाने त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळेच शरद पवारांनी शेट्टींना शह देण्यासाठी शुगर लॉबीलाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय हे नक्की.

close