मुंबई ही पेड न्यूजची राजधानी -निवडणूक आयुक्त

March 28, 2014 9:05 PM0 commentsViews: 870

28 मार्च : मुंबई ही पेड न्यूजची राजधानी आहे असा खळबळजनक दावा निवडणूक आयुक्त एच. एस. ब्रह्मा यांनी केलाय. एच. एस. ब्रह्मा यांनी आयबीएन लोकमतकडे हा धक्कादायक खुलासा केलाय. 2009 च्या निवडणुकीत पेड न्यूजचा प्रकार घडला होता. त्यामुळे यावर्षी जास्त खबरदारी घेतली जात आहे. पण सध्याची जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत बदलेली आहे.  मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. त्यामुळे इथं मोठी उलाढाल होत असते. विशेष करून इलेक्ट्रानिक मीडियाची ऑफिसेस,वृत्तपत्रांची मुख्य कार्यालयही मुंबईतच आहे. त्यामुळे पेड न्यूजसाठी मुंबई ही राजधानी ठरत आहे असं ब्रम्हा म्हणाले. तसंच निवडणुकीच्या धामधुमीत अनेक पक्षांकडून वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामध्ये सोशल मीडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. यात अनेकवेळा गैरवापर होत असल्याचं आढळून आलं असून आयोगाची यावर करडी नजर आहे असंही ब्रह्मा यांनी स्पष्ट केलं. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी मागील निवडणुकीत कोट्यावधी रुपये खर्च केले होते असं जाहीर कबूल केलं होतं तर अलीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला दिला होता. जर मोठे राजकीय नेते जाहिरपणे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर आयोग यांच्यावर कारवाई का करत नाही ? मीडियालाच का दोषी धरलं जातं ? असा सवाल विचारला असता ब्रम्ह्या म्हणतात, आयोग या प्रकरणी दखल घेत असून योग्य ती कारवाई करेल असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका शांतपणे पार पडेल यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

close