अखेर साबीर अलींचे भाजप सदस्यत्व रद्द

March 29, 2014 4:10 PM0 commentsViews: 1065

65_bjp_sabir_ali_29 मार्च : संयुक्त जनता दलाचे माजी नेते साबीर अली यांच्या भाजप प्रवेशावरून निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडलाय. भाजपने साबीर अली यांचे सदस्यत्व स्थगित केलंय. साबीर अली यांच्या प्रवेशावर राष्ट्रीय स्वय संघाने नाराजी व्यक्त केली होती. संघाच्या नाराजीमुळे भाजपने साबीर अली यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.

शुक्रवारी साबीर अली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपमधला वाद चव्हाट्यावर आला होता. साबीर अलींच्या भाजप प्रवेशाला भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी तीव्र विरोध केला होता. साबीर अलींचा इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी यासिन भटकळ याच्याशी संबंध आहे आणि त्यांना पक्षात घेणं म्हणजे भाजपच्या दहशतवादविरोधी भूमिकेशी विसंगत भूमिका आहे, असं ट्विट नक्वी यांनी केलं होतं.

पण भाजपने आपले सदस्यत्व रद्द केले असले तरी आपला अपमान केला असं मला वाटत नाही. मी स्वत:च आरोपांसंदर्भात तपासणी करण्यात यावी अशी पत्र लिहून विनंती केली होती. तोपर्यंत पक्षाचं सदस्यत्व देऊ नये असंही त्यांनी सांगितलं होतं. आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडण्याचा दावाही अलींनी केला होता.

दरम्यान, अलींच्या प्रवेशावरुन नवा वाद उफाळला. साबीर अलींना पक्षात घेण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनीच पुढाकार घेतला होता आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांशी याबाबत चर्चाही केली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सूत्रांच्या माहितीनुसार नरेंद्र मोदींनी 6 मार्च रोजी गांधीनगरमध्ये साबीर अलींची भेट घेतली होती. मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी साबीर अलींना पक्षात घेण्याची रणनीती आखली. आणि बर्‍याच उशिरा त्याची माहिती दिल्लीतल्या नेत्यांना देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.

close