‘त्या’ 13 बोलेरो पैकी 12 गाड्या पोलिसांच्या ताब्यात

March 31, 2014 6:25 PM0 commentsViews: 4395

sindhudurga boloro31 मार्च :सिंधुदुर्गात प्रचारासाठी आणलेल्या 13 नव्या बोलेरो गाड्यांचं प्रकरण चांगलंच गाजतंय. आज (सोमवारी) दुपारी चार गाड्या पोलिसांकडून सील करण्यात आल्या आहेत. त्यानंतर संध्याकाळी एकूण 12 गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. एकाच वेळी नवी मुंबईच्या ‘जी-3 मोटर्स’कडून खरेदी करण्यात आलेल्या या गाड्यांसाठी झालेल्या आर्थिक उलाढालीवर आयकर विभाग आणि निवडणूक विभागाची नजर गेल्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस गेल्या दोन दिवसांपासून या गाड्यांच्या शोधात आहेत.

या सर्व 13 बोलेरो सिंधुदुर्गातल्या काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांच्या नावे असून आपण रितसर आणि वैध मार्गाने या गाड्या खरेदी केल्याचा दावा या पदाधिकार्‍यांकडून केला जातोय. विशेष म्हणजे या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात गाड्या ताब्यात घेण्यासाठी पोलीसांकडून होत असलेल्या दमदाटी विरोधात तक्रारही दाखल केलीय.

15 फेब्रुवारी 2014 ला या गाड्या खरेदी करण्यात आल्या आणि 5 मार्च पासून निवडणूक आचारसंहिता सुरू झाली झाली असल्यामुळे या बाबतीत आचारसंहितेचा भंग होत नसल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. पण गाड्या जर वैध मार्गाने आणल्या गेल्या असतील तर त्या लपवण्याचं कारण काय असा सवाल पोलीस विचारत आहे. तर दुसरीकडे तेरा गाड्यांचा खरेदीचा काँग्रेस उमेदवाराच्या खर्चात धरून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेना भाजपाच्या वतीने करण्यात आलीय.

बोलेरो गाड्यांचा तपास
- नवीन 13 बोलेरोच्या शोधात सिंधुदुर्ग पोलीस
- MH-04-5973 ते MH-04-5985 या एकाच सीरिजच्या क्रमाने 13 गाड्या
- काँग्रेस जिल्हाध्यक्ष, काँग्रेस महिला अध्यक्ष, आणि काँग्रेस तालुकाप्रमुखांच्या नावाने गाड्या
- नवी मुंबईच्या जी-3 मोटर्सकडून खरेदी करण्यात आल्या गाड्या

close