शिवसेनेत नालायकांचा गोतावळा म्हणून बाहेर पडलो -राज ठाकरे

March 31, 2014 9:18 PM1 commentViews: 6819

raj thakrey_pune_sabha31 मार्च : मी कुणाचेही उमेदवार पाडण्यासाठी उमेदवार उभे केले नाही, उमेदवार हे जिंकण्यासाठीच उभे केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मी माझी औकात दाखवून देईल असं थेट आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलंय.

मनसेची पहिली प्रचारसभा आज (सोमवारी) पुण्यात मुळा-मुठाच्या नदीपात्रात पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. मनसेला महायुतीत घेण्यासाठी मुंडे आणि गडकरींनी पुढाकार घेतला पण उद्धव यांच्याच मनात ही गोष्टच नव्हती. उगाच आम्ही किती उदार आहोत हे दाखवत टाळीसाठी त्यांनी हात पुढे केला. या नालायकांच्या गोतावळामुळेच सेनेतून बाहेर पडलो असा गौप्यस्फोटही राज ठाकरे यांनी केला. तसंच मोदींचं भांडवल करायचं नाही आणि गरजही नाही, या देशात एक स्थिर सरकार यावं म्हणून मोदींना पाठिंबा दिला असं स्पष्टीकरणही राज यांनी दिलं.

 

टाळी द्यायची होती तर फोन का केला नाही ?

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात नववर्षाच्या शुभेच्छा देऊन केली आणि ‘आता दांडपट्टा स्टार्ट करतो’ असं म्हणून सेनेवर सडकून टीका केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ‘सामना’मधून टाळीसाठी हात पुढे करण्यात आला. जर एकत्र यायचं होतं तर वर्तमानपत्र हे त्यासाठी माध्यम नाही. टाळी जर द्यायचीच होती तर फोन का केला नाही ? फोन केला असता तर समोरासमोर चर्चा झाली असती. पण उद्धव ठाकरेंच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांच्या मनात एक आणि ओठांवर एक असंच आहे. फक्त आम्ही किती उदार आहोत हे दाखवलं गेलं. पण दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी भेट घेण्यासाठी अनेक वेळा निमंत्रण दिली. सात-आठ महिन्यांपुर्वी नितीन गडकरी यांची भेटही झाली होती. तेही नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत पुण्यात भेटही झाली. प्रत्येक वेळा त्यांनी एकत्र येण्यासाठी चर्चा केली. पण भाजपच्या नेत्यांची एकत्र घेण्याची तयारी होती पण उद्धव यांच्या मनात नव्हते असंही भाजप नेत्यांनी सांगितलं. ज्या शरद पवारांवर हे टीका करतात, त्यांचीच मदत बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधण्यासाठी कशी घेतली जाते? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं

नितीन गडकरी हा चांगला माणूस आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे व्हावा ही बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती नितीन गडकरी यांनी पूर्ण केली. एवढंच नाही तर मुंबईत अनेक उड्डाणपूलंही त्यांच्याच पुढाकाराने बांधली गेली. जर एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक केलं तर काय चुकीच आहे असा सवालही राज यांनी उपस्थिती केला.

मोदी पंतप्रधान व्हावे

मोदींचे मुखवटे घेऊ फिरण्याची आम्हाला गरज नाही. एखादा व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. मोदींनी काय काम केलं आहे ही मी गुजरातमध्ये जाऊन पाहिलं आहे. आता सेनेनं सामनातून किती वेळा मोदींवर अग्रलेख लिहला आहे. कधी गुजरातमध्ये जाऊन त्यांचं काम पाहिलं आहे का ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तसंच नरेंद्र मोदींवर मी मध्यंतरी टीका केली पण ती टीका नव्हती मैत्रीपूर्ण सल्ला होता. मोदी पंतप्रधान व्हावेत हे मी 2010 च्या प्रचारसभेत बोललेलो होतो. त्यामुळे आता मोदींचा मुखवटा लावण्याचा प्रश्न येत नाही. देशाला खंबीर, कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि हे मोदी देऊ शकतील. म्हणून नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय. असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी टेम्पो धुतात

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी एकटेच सभा घेत फिरत आहे, मुळात राहुल गांधी जेव्हा जेव्हा भाषण करण्यासाठी स्टेजवर येतात तेव्हा असं वाटत की ते टेम्पो धुण्यासाठी उभे राहिले. काँग्रेस पक्ष हा मनातून हरलाय. त्यामुळे राहुल गांधी यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही. मध्यंतरी एक वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत दिली. त्यांना काहीही प्रश्न विचारला की, ते वरती पाहून उत्तर द्यायचे. वरती काय उत्तरपत्रिका लावली होती का ? का रामदास आठवले चावले होते जे सारखं वरती पाहून उत्तर देते होते अशी खिल्लीही राज यांनी उडवली. तसंच या काँग्रेसवाल्यांनी महाराष्ट्र लुटलाय, यांना उद्धवस्त करणे गरजेच आहे. कलमाडींना तिकीट दिलं नाही मग अशोक चव्हाण यांना तिकीट दिलं. कुणी किती भ्रष्टाचार केला याचं मोजमाप करून तिकीटं दिलं का ? ज्यांनी कमी भ्रष्टाचार केला त्याला तिकीटं दिली अशी टीकाही राज यांनी केली.

 

शिवस्मारक बांधण्यापेक्षा गडकिल्ल्यांवर खर्च करा

ऐन निवडणुकाजवळ आल्या की शिवस्मारकाचा प्रश्न उकरून काढला जातो. आताही तसंच झालं. बरं, शिवस्मारक हे जरूर बांधावं. पण ते कसं बांधावं याचीही काही मर्यादा असते. म्हणे, शिवस्मारक हे अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा तीन उंच मोठं असणार आहे. मुळात स्टॅच्यू ऑफलिबर्टी हे एका बेटावर बांधण्यात आलंय. त्यामुळे त्याची उंची इतकी आहे. मग शिवरायांचा अश्वरूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा तीन इंच उंच असा उभारायचा असेल तर समुद्रात बेट निर्माण करावा लागेल. एकतरी ही लोकं नीट रस्ते तयार करत नाही बेट कसा निर्माण करणार ? आणि जर शिवस्मारक उभारायचंच ठरलं तर महाराजांचा घोडा किती मोठा असेल ? कोण शिल्पकार असं करणार ? मी जेजे ऑर्टचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला शिल्प कसं बांधायचं हे शिकवू नये. शिवस्मारक बांधण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 हजार कोटी खर्च येईल हाच खर्च जर शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर केला तरच खर्‍या अर्थाने शिवरायांचं स्मारक बांधलं असंच होईल असं मतही राज यांनी व्यक्त केलं.

 

close