कल्पना गिरी हत्येप्रकरणी : महिला आयोगाने ही घेतली दखल

April 1, 2014 12:24 PM0 commentsViews: 3012

latur1 एप्रिल :  युथ काँग्रेसची कार्यकर्ती कल्पना गिरी हिच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने ही घेतली आहे. आयोग आता लातूर पोलिसांकडून अहवाल मागवणार असून प्रकरणावर महिला आयोगाची बैठक ही होणार आहे.

लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रसिंग चौहान आणि काँग्रेसचा कार्यकर्ता समीर किल्लारीकर यांना या प्रकरणात 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा, पोलिसांनी केला आहे. पण दुसरीकडे महेंद्रसिंग चौहानला अटक केल्यानंतर आपल्या कुटुंबावर सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप कल्पनाच्या पालकांनी केला आहे. हत्ये पूर्वी कल्पनावर बलात्कार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

21 मार्चला आमदार अमित देशमुख यांचा वाढदिवस होता. त्यादिवशी काँग्रेस कार्यर्त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी म्हणून घरातून निघालेली 29 वर्षांची कल्पना त्यानंतर बेपत्ता होती. 24 मार्चला तिचा मृतदेह तुळजापूरच्या पाचुदा आढळून आला. महेंद्रसिंग चौहानं यानं तिला तिथल्या एका तलावात ढकलल्याचा गौप्यस्फोट समीर किल्लारीकर यांनीच पोलिसांकडे केला आहे.

एक वर्षभरापूर्वी युथ काँग्रेसच्या स्थानिक समितीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीनंतर प्रदेश काँग्रेसकडून कल्पनाची दखल घेण्यात आली. यानंतर महेंद्रसिंग चौहान यांनी कल्पनावर आगपाखड केली होती. तेव्हापासून तिच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. आता, तिचं अपहरण करुन तिची हत्या करण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर मात्र, या सगळ्या प्रकाराबद्दल 10 दिवसानंतरही मौन बाळगण्यात आलं आहे.

close