मोहन भागवत नवे सरसंघचालक

March 21, 2009 7:25 AM0 commentsViews: 4

21 मार्च, नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सुदर्शन यांनी पद सोडलं आहे. मोहन भागवत नवे सरसंघचालक होणार आहेत. नागपूरमध्ये संघाच्या कार्यकारणची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. आज संध्याकाळी 4 वाजाता नव्या सरसंघचालकांकडे सूत्र देण्यात येतील. देशभरातून आलेल्या संघ कार्यकर्त्यांची तीन दिवसांची बैठक शुक्रवारपासून नागपुरात सुरू झाली. एस. सुदर्शन यांनी पद सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर भागवत यांचा मार्ग मोकळा झाला. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी या निवडीची घोषणा केली. सुदर्शन यांनी पंच्याहत्तरी पार केली आहे. संघाच्या कार्यात तरुण रक्ताला वाव मिळावा म्हणून मोहन भागवत यांना स्थान देण्यात आलं आहे. भागवत हे 65 वर्षांचे आहेत. संघाच्या आंतर्गत रचनेनुसार सरकार्यवाह या पदाची निवड दर तीन वर्षांनी होते त्यानुसार नवे सरसंघचालक म्हणून मोहन भागवत यांची निवड होण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. सरसंघचालकांच्या बैठकीस भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग, विश्वहिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया यांची उपस्थिती होती. 65 वर्षांचे मोहन भागवत आर.एस.एस. म्हणजे राष्ट्रीस स्वयंसेवक संघाच्या इतिहासातले सर्वात तरुण सरसंघचालक आहेत. आरएसएसचे केशव हेडगेवार. एम.एस.गोळवलकर, बाळासाहेब देवरस, राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भय्या, के. सी. सुदर्शन यांच्यानंतर आता मोहन भागवत हे संघाची सूत्रं हाती घेतील. भागवत मूळचे चंद्रपूरचे. वेटरनरी डॉक्टर आहेत. मात्र त्यांनी पदवीनंतर पूर्णवेळ संघाच्या कार्याला वाहून घेतलं. महाराष्ट्रात अकोल्याचे जिल्हा प्रचारक, बिहारचे प्रांत प्रचारक म्हणून काम केल्यानंतर त्यांना 2000 साली सरकार्यवाहपदी नेमण्यात आलं. उत्तम वक्ता असलेले भागवत प्रत्येक राज्याला वर्षातून दोनदा भेटी देत असतात. भारताशिवाय इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, केनिया, नेदरलँड या देशांना त्यांनी भेटी दिल्यात. मोहन भागवत यांची हत्या करण्याची योजना मालेगाव बाँबस्फोटातील आरोपी आणि स्वयंघोषित शंकराचार्य सुधाकर द्विवेदीनं आखली होती. मालगेव स्फोटाचा आणखी एक आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याची मदत त्यासाठी घेण्यात आली होती. पण त्यांच्या अटकेमुळं ही योजना फसली होती.

close