बेस्ट पाठोपाठ रिक्षाचालकांचाही संपाचा इशारा

April 1, 2014 4:12 PM2 commentsViews: 1539

Image img_218942_autoriksh54_240x180.jpg01 एप्रिल : मुंबईत बेस्ट कर्मचार्‍यांना पुकारलेल्या संपामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची आणखी कोंडी होण्याची शक्यता आहे. बेस्ट कर्मचार्‍यांच्या संपात आता रिक्षा युनियननेही उडी घेतलीय.

बेस्टच्या कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या बुधवारी रिक्षाचालकही संपावर जाण्याची शक्यता आहे. रिक्षाचालक युनियनचे नेते शरद राव यांनी बेस्टच्या नव्या वेळापत्रकाला कडाडून विरोध केलाय. बेस्ट व्यवस्थापनाची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. व्यवस्थापन कर्मचार्‍यांची पिळवणूक करत आहे. त्यामुळे जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असा इशारा शरद राव यांनी दिला.

मात्र या संपामुळे गुढीपाडव्याच्या सुट्टीनंतर आज कामाला निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. मुंबईत बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्स्पोर्ट म्हणजेच बेस्टच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला. जवळजवळ 13 हजार बस ड्रायव्हर आणि साधारण तेवढेच कंडक्टर आज सकाळी अचानक संपावर गेले. 12 तासांच्या ड्युटीच्या विरोधात हा संप आहे. या संपामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. आजपासून 12 तासांची ड्युटी लावणारे कॅनेडियन वेळापत्रक लागू करण्यात आलंय. त्यामुळे वाहक आणि चालक संतापले आहेत.

कॅनेडियन वेळापत्रकाप्रमाणे 4 तासांची ड्युटी, 4 तासांची विश्रांती आणि मग पुन्हा 4 तासांची ड्युटी असं विचित्र वेळापत्रक बेस्ट प्रशासनाने कर्मचार्‍यांवर लादलंय. औद्योगिक न्यायालयाने या वेळापत्रकाला दिलेली स्थगिती हायकोर्टाने उठवलीय. त्यामुळे आजपासून हे वेळापत्रक बंधनकारक करण्याचा बेस्ट प्रशासनाने निर्णय घेतलाय. मात्र संपाची कल्पना नसल्यामुळे आणि सकाळी ऑफिसमध्ये जाण्यासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्याची पुरती वाट लागली. बस नसल्यामुळे रिक्षा, टॅक्सीची वाट धरावी लागली. पण या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सीसाठी लांबच्या लांब रांगा लागल्यात.कसेबसे रिक्षा टॅक्सीने चारपैसे शिल्लक मोजून चाकरमान्यांना ऑफिस गाठावे लागले पण संध्याकाळी परत घरी कसं जायचं हा प्रश्न चाकरमान्याना पडलाय.

तर दुसरीकडे परिक्षांचे दिवस असल्यानं विद्यार्थ्यांनाही या संपाचा फटका बसला. या अचानक पुकारलेल्या संपाबद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. तर कर्मचारी मुंबईकरांना वेठीस धरत आहे. सर्व कर्मचार्‍यांनी व्यवस्थापनेच्या निर्णयाला परवानगी दिलीय पण युनियनच्या माध्यमातून व्यवस्थापनाचा निर्णय स्विकारत नाहीय असा आरोप बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी केला. दरम्यान, आझाद मैदानावर 4 वाजता बेस्ट कामगारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

  • yogesh

    only conductor aani driver la 12 tasachya dutya ka

  • siddhita kadam

    ekada BEST kamagarabchi baju,tyanchye problems aani maganya ekun ghetalya pahije. nawya rule nusar tyana tyanchya gharapasun 14 tas tari dur rahawe laganar aahe……. he kahi barobar nahi…..

close