ज्याने बाळासाहेबांचं ऐकलं नाही तो माझं काय ऐकणार ? -उद्धव

April 1, 2014 7:33 PM1 commentViews: 5107

udhav on sharad pawar_201 एप्रिल : ज्याने बाळासाहेबांचं ऐकलं नाही, तो माझं काय ऐकणार ?, बाळासाहेबांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. या निवडणुकीत काय औकात दाखवायची ती दाखवा, शिवसेना म्हणजे वाघाचे छावे आहे आम्हाला काही फरक पडत नाही असं सडेतोड उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिलं.

तसंच मला कंटाळून शिवसेना सोडली तर फोनसाठी वाट का पाहता होता ? असा सवालही उद्धव यांनी राज यांना विचारला. मुंबईत वरळीमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघाती टीकाही केली.

लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय. “माझ्या पक्षाची औकात काढणार्‍या शिवसेनेला निवडणुकीत पक्षाची औकात दाखवणार” असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सेनेला दिला होता. तसंच टाळी द्यायचीच होती तर फोन का नाही केला ? फोन करून चर्चा झाली असती असा सवालही राज यांनी उद्धव यांना विचारला होता. राज यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं.

काय औकात दाखवायची ती दाखवा

आम्ही कधी पक्षाशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब असताना राज ठाकरे सेनेतून बाहेर पडले. बाळासाहेबांनी राज यांना सादही दिली पण त्याने बाळासाहेबांचं ऐकलं नाही. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची त्यांची लायकीच नाही. या निवडणुकीत काय औकात दाखवायची ती दाखवा, शिवसेना म्हणजे वाघाचे छावे आहेत आम्हाला काही फरक पडणार नाही असं उत्तर उद्धव यांनी दिलं.

घराजवळ असूनही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी का आला नाही ?

तसंच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी दर्शनासाठी देशाभरातून लोक आले, शरद पवार सुद्धा आले होते पण राज आले नाहीत. घरासमोर असूनही का आले नाही ? मला कंटाळून जर शिवसेना सोडली होती तर ‘टाळी’च्या वेळी फोनची वाट का बघत होता ? असा सवालही उद्धव यांनी उपस्थिती केला.

भूखंड विकला असेल सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन

मुंबई महापालिकेवर सेनेची सत्ता जरी असली तरी आजपर्यंत एक भूखंडही लाटला नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी भूखंड लाटण्याचा प्रश्नच नाही. जर मी भूखंड विकला असेल असं सिद्ध झालं तर राजकारण सोडून देईन असंही उद्धव यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंना काय टीका करायची ती करू द्या, त्याला आपण उत्तर देणार नाही. हा विषय इथेच संपला आहे आरोप जरी केले तरी लक्ष देणार नाही असंही उद्धव यांनी बजावून सांगितलं. तसंच काँग्रेसने टाकलेला हा फास आहे यामध्ये अडकू नका असा सल्लाही उद्धव यांनी राज यांना दिला.

close