ग्राऊंड रिपोर्ट : रामटेकचा गढ कोण राखणार?

April 1, 2014 8:30 PM0 commentsViews: 1234

आशिष जाधव, रामटेक.

01 एप्रिल : नागपूरजवळच्या रामटेक मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होतेय. एके काळी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांना लोकसभेत पाठवणार्‍या या मतदारसंघात यावेळी काँग्रेसचे सरचिणीस मुकुल वासनिक दुसर्‍यांदा नशीब आजमावत आहेत. पण त्यांना महायुतीच्या कृपाल तुमाने जोरदार टक्कर देत आहेत. आमचे प्रिन्सिपल करस्पॅांडंट आशिष जाधव यांचा हा थेट रामटेकहून ग्राऊंड रिपोर्ट

यूपीए सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्री असलेल्या मुकुल वासनिक यांच्यामुळे रामटेक मतदारसंघाला महत्त्व आलंय. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. इथे निवडणूक लढवण्यासाठी जातींपातीच्या राजकारणाचा मोठा आधार घेतला जातोय. त्याचा एक भाग म्हणून प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि सुलेखा कुंभारे या दलित नेत्यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत सामावून घेण्यात आलं. एवढंच नाही तर गेल्या वेळी बसपच्या तिकीटावर उभ्या असेलल्या उमेदवारालाही वासनिकांनी आपल्या गोटात ओढलंय. दलित मतांचं तरी विभाजन होऊ नये, याचा पुरेपूर प्रयत्न वासनिकांनी केलाय.

वासनिक काँग्रेस हायकमांडच्या जवळ असले. तरी मतदारांपासून दुरावल्याचा विरोधकांचा आरोप आहे. रामटेकची जागा कायम राखणं सोपं नसल्याचं लक्षात आल्यावर मुकुल वासनिकांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेल्या वर्षाभरापासून ते या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. आचारसंहिता लागेपर्यंत त्यांनी घाईघाईत अनेक उद्घाटनं आणि भूमिपूजनंही उरकून घेतली. पण विकासकामांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय.

आकारानं मोठ्या असलेल्या रामटेक मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांचा समावेश होतो तसंच या मतदारसंघात शिवसेनेचा एकच आमदार असला तरी भाजपचे मात्र 3 आमदार आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे इथे महायुतीची ताकद भक्कम दिसते. पण मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर बसपकडे पूर्ण दुर्लक्ष करता येणार नाही. यावेळी आम आदमी पार्टी सस्पेन्स फॅक्टर आहे. चुरशीच्या लढतीत आप किती मतं मिळवतं हे निर्णायक ठरू शकतं.

रामटेकचा मतदारसंघाचा आढावा

  • रामटेक मतदारसंघात नागपूरमधल्या 12 तालुक्यांचा समावेश
  • रामटेकमध्ये शिवसेनेचा 1, भाजपचे 3 आमदार
  • काँग्रेसचा 1 आमदार
  • राष्ट्रवादीचा 1 आमदार
  • रामटेकमध्ये महायुतीची ताकद जास्त
  • बसप, आपची मतं निर्णायक

सर्व थरांतून पाठिंबा मिळत असल्याचा मुकुल वासनिकांचा दावा असला तरी महायुतीने अख्खा मतदारसंघ आधीच पिंजून काढलाय. त्यातच मतदारसंघातल्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने रामटेकचा गड कायम राखणं मुकुल वासनिकांना कठीण जाणार हे स्पष्टच आहे.

close