मुंबईकर वेठीस, बेस्टचा संप सुरूच

April 2, 2014 3:34 PM0 commentsViews: 796

Image img_223672_bestbus_240x180.jpg2 एप्रिल : बेस्ट कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप आता आणखी चिघळण्याच्या मार्गावर आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि कामगार युनियनचे नेते शरद राव यांची बैठक पार पडली पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.आता मुख्य सचिवांसोबत बैठक पार पडणार आहे या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर कर्मचार्‍यांवर कारवाई करावी असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने बेस्ट कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर ठरवला आहे तरी कर्मचारी संपावर कायम आहे.

आंदोलन 15 दिवस पुढे ढकला

आज बेस्ट कर्मचार्‍यांच्या आंदोलनाविरोधात ग्राहक पंचायतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीत हायकोर्टाने या कर्मचार्‍यांना त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले आहे. आंदोलन 15 दिवस पुढे ढकला, 15 दिवसांत प्रशासनाशी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या, असं कोर्टानं म्हटलंय. यावर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचार्‍यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय बेस्ट समितीनं घेतलाय. पण कर्मचार्‍यांवरची ही कारवाई कशा स्वरूपाची असेल हे मात्र बेस्टनं स्पष्ट केलेलं नाही.

मुंबईकरांचे हाल, रिक्षाचालकांकडून लूट

कॅनेडियन पद्धतीच्या विरोधात मुंबईत बेस्ट संपाचा आज दुसरा दिवस आहे. आज सकाळपासूनच लाखो मुंबईकरांचे हाल होत आहेत. बेस्टच्या बसेस धावत नसल्याचा गैरफायदा खासगी बसचालक आणि रिक्षाचालकांनी घेतला. एरवी ज्या अंतरासाठी 20 रुपये लागतात तिथं आज 100 रुपये मोजावे लागत होते. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा संताप होत होता. विशेषतः महिलांचे खूप हाल झाले. आज संपूर्ण सकाळ मुंबईभर हीच अवस्था होती. रिक्षावाले अव्वाच्या सव्वा भाडं उकळतात. अंधेरीलाही बसेस नसल्यामुळे लोकांनी खासगी बसेसचा आसरा घ्यावा लागला. चर्चगेटमध्ये सीएसटी रेल्वे स्टेशनबाहेर एरवी गर्दी उसळलेली असते, तिथं बस स्टॉप सुनेसुने आहेत.

close