‘बेस्ट’झालं, कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे

April 2, 2014 5:29 PM0 commentsViews: 1105

Image img_218422_bestbus34_240x180.jpg02 एप्रिल : दीड दिवस मुंबईकरांना वेठीस धरणार्‍या बेस्ट कर्मचार्‍यांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. मुख्य सचिव आणि कामगार नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने माघार घेतली. कॅनेडियन पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करून 1 जून 14 पासून नव्याने अंमलात आणले जाणार असल्याचं बेस्ट व्यवस्थापनाने स्पष्ट केलं. त्यानंतर युनियनने यावर संमती दर्शवत संप मागे घेत असल्याची घोषणा केली. संप मागे घेण्याच्या घोषणेबरोबरच बस सेवा तातडीने सुरू करण्यात येईल असं कामगार नेते शरद राव यांनी स्पष्ट केलं.

कॅनेडियन पद्धतीच्या विरोधात बेस्टच्या कर्मचार्‍यांना मंगळवारी सकाळपासून अचानक संप पुकारला. आपल्या मागण्यावर ठाम राहत कर्मचार्‍यांना कडकडीत संप पुकारल्यामुळे बेस्ट बस आगारातून एक बसही बाहेर पडली नाही. त्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. गेली दीड दिवस एकही बस रस्त्यावर धावली नसल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसला. त्यामुळे बेस्टच्या संपाची हायकोर्टाने दखल घेतली. बेस्ट कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर असून ताबडतोब कामावर रुजू व्हा असे आदेश दिले होते पण बेस्ट कर्मचार्‍यांना संप मागे घेण्यास नकार दिला.

आज संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्ट प्रशासन आणि कामगार युनियनचे नेते शरद राव यांची बैठक पार पडली पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मुख्य सचिवांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं  या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर कर्मचार्‍यांवर कारवाई करावी असे निर्देश प्रशासनाने दिले होते.एवढेच नाही तर आज बेस्ट कर्मचार्‍यांच्या आंदोलनाविरोधात ग्राहक पंचायतीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीत हायकोर्टाने या कर्मचार्‍यांना त्वरित काम सुरू करण्याचे आदेश दिले. आंदोलन 15 दिवस पुढे ढकला, 15 दिवसांत प्रशासनाशी चर्चा करा आणि मग निर्णय घ्या, असं कोर्टाने बजावलं होतं. पण बेस्टच्या बसेस धावत नसल्याचा गैरफायदा खासगी बसचालक आणि रिक्षाचालकांनी घेतला. एरवी ज्या अंतरासाठी 20 रुपये लागतात तिथं आज 100 रुपये मोजावे लागत होते. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा संताप होत होता. विशेषतः महिलांचे खूप हाल झाले. गेली दोन दिवस मुंबईकरांना बेस्टच्या आंदोलनाचा नाहक त्रास सहन करावा लागला.

close