राज्यात मतदानावर बहिष्काराचे सावट!

April 3, 2014 10:20 AM0 commentsViews: 1738

no voting03 एप्रिल : विविध मागण्यांकडे राज्य सरकार काना डोळाकरत असल्याचा आरोप करत राज्यात अनेक ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातार्‍यामधल्या शेतकर्‍यांना सतावताहेत सातबार्‍याच्या समस्या
‘आमचे सातबारे कोरे करा’ तरच आम्ही मतदान करु असं म्हणत सातार्‍यातील 13 गावांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनीवर श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज राजेभोसले असा शिक्का प्रत्येक शेतकर्‍याच्या सातबार्‍यावर सरकारनं मारला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजघराण्याचं नाव काढावं यासाठी शेतकरी लढा देतायेत. पण त्यांच्या या लढ्याला लोकप्रतिनिधींकडून कचर्‍याची टोपली दाखवण्यात आली, त्यामुळे या शेतकर्‍यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार विवेक पंडित यांनी शेतकर्‍यांच्या सातबार्‍यांवरुन उदयनराजेंचा शिक्का काढावा यासाठी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात अचानक उदयनराजेंनी उडी घेतल्यानं प्रशासनाची तारांबळ उडाली होती. त्यानंतर विवेक पंडितांनी शेतकर्‍यांचे सातबारे कोरे झाल्याचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नसल्याचं शेतकरी सांगतायेत. त्यामुळेच जावळी खोर्‍यातल्या 13 गावांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मतदानावर बहिष्काराचा निर्णय कळवला आहे.

वाशिममध्ये मुलभूत गर्जांकडे दुर्लक्ष
वाशिम जिल्ह्यातील भामटवाडी इथं पक्क्या रस्त्यासह इतर सुविधा नसल्यानं लोकसभेबरोबरच रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात तर तीन महिने या गावाचा संपर्क तुटतो. गावात आरोग्य, पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. रात्री कुणी आजारी पडल्यास त्याला हॉस्पिटल गावात सोईसुविधा नसल्यानं निवडणुकीत मतदान करणार नाही असं 6 महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदारांना कळवलं आहे. त्यानुसार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गावकर्‍यांनी मतदान केलं नाही. यावेळी तत्कालीन पालकमंत्री विजय गावितांनी ग्रामस्थांची भेट घेतली होती. पण त्यांनी गावकर्‍यांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही. मात्र आयबीएन लोकमतची टीम गावात पोहोचल्यावर तहसीलदारांनी गावकर्‍यांची भेट घेत मतदान करण्याविषयी समजूत घातली.

अमरावतीत गावबंदी
अमरावती जिल्ह्यातल्या रोहणखेडा आणि पर्वतपुर या दोन्ही गावच्या प्रकल्पग्रस्त लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहीष्कार टाकला आहे. पेढी नदीवर बांधण्यात येत असल्यानं ही गावं बुडीत क्षेत्रात गेली आहेत त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करावंअशी मागणी गावकर्‍यांनी केली होती. शासनाने ही मागणी मान्य करून आता 7 वर्ष होऊनही पुनर्वसन न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावकर्‍यांनी मतदानावर बहीष्कार टाकत प्रचारासाठी गावात येणार्‍या उमेदवार आणि पुढार्‍यांनी गावबंदी केली आहे.

लातूरमधले शिक्षक नाराज
लातूर जिल्ह्यातील अनुदानित तुकडीवर कार्यरत असलेल्या सुमारे 400 शिक्षकांचे वेतन डिसेंबर 2012 पासून प्रशासनाने कोणतीही पूर्व सुचना न देता बंद केल गेल आहे. या संदर्भात अनेक वरिष्ठांना निवेदने देऊन सुध्दा प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे या 400 शिक्षकांनी आपल्या कुटुंबियांसह लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशा आशयाचे निवेदन देखील या शिक्षकांनी लातूरच्या जिल्हाधिकार्‍यांना दिलं आहे. या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची हि पहिलीच वेळ महाष्ट्रात समोर आली असून त्यामुळे लातूरची लोकसभा यावेळी रंगणार यात शंकाच नाही.

खारनगरमधल्या रहिवाश्यांची घोर निराशा
जनतेच्या पश्नांकडे दुर्लक्ष करणार्‍यां लोकप्रतिनिधींकडे, जनता ही पाठ फिरवू शकते हे सिद्ध करुन दाखवलय मुंबईच्या खारनगर परिसरातल्या रहिवाशांनी. खारनगरच्या 28 नंबर बिल्डींगनं आपल्या इमारतीबाहेर आम्हाला माफ करा पण आम्ही कोणत्याही उमेदवाराला मतदान करणार नाही असा फलक लावलाआहे. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी आमची घोर निराशा केल्यामुळे आम्ही कुणालाही मतदान करणार नाही असं सांगितलं आहे.

close