सिंधुदुर्गच्या आखाड्यात रुतले ‘बोलेरो’चे चाक !

April 3, 2014 7:33 PM0 commentsViews: 985

bolero_sindhudurgaदिनेश केळुसकर, रत्नागिरी

03 एप्रिल : सिंधुदुर्ग पोलिसांनी जप्त केलेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या 13 बोलेरोंचं प्रकरण आता चांगलंच तापलंय. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केलेली ही कारवाई चुकीची आहे, असं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याविरोधात त्यांनी वेगवेगळ्या कोर्टात तक्रारी दाखल केल्या आहेत. भाजपनंही या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. त्यामुळे हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनलाय.

सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच सिंधुदुर्गचे एसपी राजेंद्र त्रिमुखे यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या वादग्रस्त 13 बोलेरो गाड्या जप्त केल्या आहेत. त्यामुळे एसपी विरुद्ध राणे समर्थक असा संघर्ष सिंधुदुर्गात सुरू झालाय.

“रीतसर पहिल्या चार गाड्यांना जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिलेली होती. नंतर सावंतवाडीमधल्या पाच गाड्यांनाही परवानगी दिली होती.या गाड्या काही लपवून छपवून ठेवल्या नाहीत. आज आमच्या उमेदवारांचं वातावरण चांगलं असताना चुकीच्या पद्धतीने एसपी कारवाई केली. हे सगळं कटकारस्थान एसपीने केलेले आहे असा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांनी केला.

या कारवाईविरोधात आम्ही वेगवेगळ्या तालुका न्यायालयात तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्हा न्यायालयात जी परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे. तपासाची त्याविरोधात रिव्हिजन दाखल केलाय. संबंधित सर्व पोलीस अधिकार्‍यांविरोधात तक्रार केल्या आहेत. या ही व्यतिरिक्त एसपी सिंधुदुर्ग यांची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडेही करतो आहोत असं काँग्रेसचे वकील ऍड.संग्राम देसाई यांनी सांगितलं.

दुसरीकडे, भाजपनेही आता हे प्रकरण उचलून धरलाय. या तेरा बोलेरो ठाणे आरटीओकडे रजिस्टर्ड झाल्या आहेत. या बोलेरोसाठी काँग्रेस पदाधिकार्‍यांनी बोगस पत्ते दिले आहेत. ही आरटीओची माहिती आहे. वानगीदाखल सांगतो नारायण राणेंचे पीए संदीप भोसले. हे कणकवलीत राहतात..त्याचा पत्ता.सतीश सावंत यांनी गोसावीवाडी भिवंडीत नेलीय. बोलेरो गाड्यांसाठी ठाणे आरटीओला देण्यात आलेले काँग्रेस पदाधिकार्‍यांचे पत्तेच बोगस आहेत, असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला.

बोलेरोवरची खरेदी वैध की अवैध हे काही दिवसात न्यायालयातूनच स्पष्ट होईलच. पण निलेश राणेंच्या प्रचाराच्या ऐन बहरात सिंधुदुर्ग पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे महत्वाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या कामाचे दिवस वाया जातायत. आणि साहजिकच याचा फायदा शिवसेना-भाजपाला होताना दिसतोय.

बोलेरोवरची ही कारवाई नेमकी का आणि कोणत्या आधारे करण्यात आली याबद्दल बोलायला सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि एसपींनी नकार दिलाय. पण यामुळे सिंधुदुर्गातला राजकीय तणाव वाढत चाललाय.

close