चंद्रपूर लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत

April 4, 2014 9:03 AM0 commentsViews: 381

महेश तिवारी, चंद्रपूर

04  एप्रिल :  चंद्रपूर लोकसभा मतदार संघात येत्या 10 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. कोळसा घोटाळा उघड करणारे खासदार हंसराज अहीर तिसर्‍यांदा रिंगणात उतरले असुन अहीर यांच्या विरोधात राज्याचे पर्यावरणमंत्री संजय देवतळे उभे आहेत तर शेतकरी नेते अशी ओळख असलेले वामनराव चटप आप कडुन उभे असल्यानं इथं सध्या तिरंगी लढतीच चित्र तयार झालंय. निवडणुकीत तीनही तगडे उमेदवार असल्याने चंद्रपूरची निवडणुक लक्षवेधी बनली आहे.

ताडोबा अभयारण्य आणि कोळसा खाणीसाठी प्रसिध्द असलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण गेल्या दोन निवडणुकींपासून भाजपाचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या गडाला खिंडार पाडलंय. तर हंसराज अहीर यांची हॅट्रीक रोखण्यासाठी काँग्रेसनं राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री देवतळे यांना उमेदवारी दिलीय. या दोघांपुढेही कडवं आव्हान उभं केलंय ते शेतकरी संघटनेचे नेते ‘आप’चे उमेदवार वामनराव चटप यांनी. 2009 मध्ये हंसराज अहीर 29 हजार मतंानी विजयी झाले होते. दांडगा जनसंपर्क आणि मतदारसंघातल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना जमीनीचा मिळवुन दिलेला मोबदला या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. इकडे, देवतळेंपुढे आव्हान आहे ते गटबाजीचं. माजी खासदार नरेश पुगलिया गटाने प्रचारापासुन स्वत:ला दूर ठेवलंय.

आपचे उमेदवार वामनराव चटपांचा प्रभाव यावेळी कितपत पडतोय, यावर काँग्रेस भाजपमधल्या लढतीची रंगत ठरणार आहे. चटप यांनी 2009 मध्ये अपक्ष म्हणून 1 लाख 70 हजार मतं घेतली होती. यावेळी ते ‘आप’चे उमेदवार आहेत. आपचा करिश्मा चटपांना मताधिक्य देईलच, शिवाय गेल्या वेळच्या पराभवानंतरही चटपांनी मतदारसंघात सतत जनसंपर्क ठेवलाय.

या मतदारसंघात साडेचार लाख मतदार हे धनोजे – कुणबी असल्यानं या मतांवर चटपांनी लक्ष केंद्रीत केलंय. अनुसुचित जातीची आणि मुस्लिम मतंही इथं निर्णायक ठरणार आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उघडपणे देवतळेंच्या प्रचारात असले तरी चटपांना छुपी मदत करत असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते अहिरांच्या विरोधाची भाषा उघडपणे बोलतायत.

एकूणच प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वामनराव चटपांमुळे होणारं विभाजन कोणाच्या पथ्यावर पडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

close