ग्राऊंड रिपोर्ट : नागपूरच्या आखड्यात चुरशीची लढत

April 4, 2014 11:17 AM0 commentsViews: 832

आशिष जाधव, नागपूर
04 एप्रिल :  महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरची यंदाची लढत मोठी चुरशीची आहे. नागपूरमधून पाच वेळा जिंकून आलेले विलास मुत्तेमवार, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गडकरींच्या विरोधात आरोपांची राळ उठवणार्‍या ‘आप’च्या अंजली दमानिया यांच्यामुळे ही लढत तिरंगी होतेय. मात्र खरी लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच असेल.

देशातल्या मध्यवर्ती शहर असलेल्या नागपूरात पारा प्रचंड चढायला लागलाय. मात्र या चढत्या पार्‍याची पर्वा न करता सध्या काँग्रेस, भाजप आणि आप या तिन्ही पक्षांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्राची उपराजधानी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि दीक्षाभूमी या एकाच शहरात असल्याने राजकीयदृष्ट्याही हे शहर महत्त्वाचं आहे. पण वारंवार नेत्यांकडून विकासाची आश्वासनं मिळूनही इथे अपेक्षित विकास न झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

या मतदारसंघात असलेल्या 6 आमदारांपैकी 4 आमदार भाजपचे आहेत. त्यातच नागपूर महापालिकेची सत्तासुद्धा भाजपकडे आहे. देशातही मोदीचं वारं असल्याचं चित्र निर्माण झाल्याने सात वेळा लोकसभेमध्ये नागपूरचं प्रतिनिधित्व करणार्‍या विलास मुत्तेमवारांसमोर गडकरींच्या रूपात तगडं आव्हान निर्माण झालंय. स्थानिकांनी मुत्तेमवारांना वारंवार निवडून देऊनही इथला विकास झाला नसल्याचा भाजपचा आरोप आहे.

नागपुरात 27 टक्के दलित मतांबरोबरच मुस्लिमांचीही 11 टक्के मतं निर्णायक ठरणार आहेत. आणि काँग्रेसला ही अल्पसंख्याकांची मतं कायमस्वरूपी पक्षाकडे असल्याचा विश्वास आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आप आक्रमक आहे.

यंदाच्या निवडणुकीत नागपूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनाही विजयाचा मार्ग सोपा नाही, हे स्पष्टच आहे.

आता या राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत मतदार कौल नेमका कोणत्या मुद्द्याला देतात हे अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर
– दलित मतं – 27 %
– मुस्लीम मतं – 11 %
नागपुरात 27 टक्के दलित मतांबरोबरच मुस्लिमांचीही 11 टक्के मतं निर्णायक ठरणार आहेत आणि काँग्रेसला ही अल्पसंख्याकांची मतं कायमस्वरूपी पक्षाकडे असल्याचा विश्वास आहे.

close