बाळासाहेबांनी ‘सुपा’ एवढं दिलं, त्याचं काय?-उद्धव ठाकरे

April 5, 2014 3:22 PM2 commentsViews: 3405

udhav on raj05 एप्रिल :: ज्यांची लायकी नसताना बाळासाहेबांनी त्यांना ‘सुपा’ एवढं दिलं ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय? असा खडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना विचारलाय. तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढीत आम्ही रान पेटविले आहे. पण वडे आणि चिकन सुपवाल्यांनी मात्र वडवानलावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करायची आहे असा घणाघाती आरोपही उद्धवनी केला. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून राज ठाकरेंच्या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलाय.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामनाच रंगलाय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात प्रचाराचा नारळ फोडला आणि थेट शिवसेनेवर निशाणा साधला. टाळी द्यायची होती तर फोन का नाही केला ? ओठांवर एक मनात एक.. असल्या टोणग्यांमुळेच आपण सेनेतून बाहेर पडलो असा घणाघाती प्रहार राज यांनी केला होता. तसंच डोंबिवलीत झालेल्या सभेत ‘खंजीर खुपसला’ या उद्धव ठाकरेंच्या टीकेचा भावनिक समाचार राज यांनी घेतला. आजारी असताना हॉस्पिटलमध्ये सोबत होतो, एकाच गाडीत मांडीला मांडी लावून ‘मातोश्री’वर गेलो होते तेव्हा नाही वाटलं की, पाठीत खंजीर खुपसला?,बाळासाहेबांना तेलकट बटाटेवडे दिले जायचे. हे पाहुन मी व्यथीत झालो. त्यामुळे बाळासाहेबांना चिकन सूप पाठवले ते त्यांनी ते घेतलं असा घरचा खुलासाही राज यांनी केला.

राज यांनी सूप आणि वड्यांचा उल्लेख केल्यामुळे तलवार म्यान केलेल्या उद्धव ठाकरे मैदानात हजर झाले. सेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून राज यांना खडासवाल विचारण्यात आला. भाऊबंदकीवर सध्या बरेचजण आपली डोकी खाजवत आहेत. राजकारणात अशा भाऊबंदक्यांना ऊत आला असला तही आम्ही मानतो ते भाबंधन व शिवबंधन. कारण भाऊबंदक्यांची मजा भलतेच लोक घेतात व भाऊबंदक्यांनी मोठमोठी साम्राज्ये लयास गेलीय, पण भाऊबंदकी व बंडखोरी ही सामाजिक हितासाठी, राष्ट्रहितासाठी असेल तर त्या भाऊबंदकीचेही स्वागत करायला हरकत नाही असं सांगत दिल्लीतील बुखारी बंधूंचं उदाहरण देऊन राज यांची कानउघडणी करण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला. तसंच शिवाजी महाराजांच्या काळातही भाऊबंदकीचा जोर होताच व महाराजांना मोगलांपेक्षा जास्त लढाया स्वकीय, मराठ्यांशीच लढाव्या लागल्या. स्वकीयांनी जसे शिवरायांना अडथळे निर्माण केले तेच भोग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नशिबी आले. शेवटी तर खंजीर खुपसण्यासाठी आपल्या पाठीवर जागाच उरली नसल्याचे बाळासाहेब गमंतीने म्हणत असे अशी आठवण करून राज यांना टोला लगावला.

ज्यांची लायकी नसताना बाळासाहेबांनी त्यांना ‘सुपा’ एवढं दिलं ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सुपचे बिल जाहीर सभांतून फडकवतात. हा निलाजरेपणाच नाही काय ? असा खडासवालही उद्धव यांनी राज ठाकरेंना विचारलाय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पापांवर व अघोरी कारभारांवर कोरडे ओढीत आम्ही रान पेटविले आहे. पण वडे आणि चिकन सुपवाल्यांनी मात्र वडवानलावर पाणी ओतून जणू काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करायची आहे. मराठी तरुणांना आपापसात लढवून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मजा लुटत आहे. पण शिवसेनेचा विजयी घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने रचलेला हा सापळा आहे असा आरोपही उद्धव यांनी केला. एकंदरीतच उद्धव यांनी राज यांनी कितीही टीका केली तरी उत्तर देणार नाही असं स्पष्ट करून टाकलं होतं पण राज यांच्या टीकेमुळे उद्धव यांनी टीकास्त्र सोडले आहे त्यामुळे ठाकरे बंधूंतील वाकयुद्ध आणखी चिघळणार असल्याची शक्यता आहे.

 

  • vikram

    Italychi rani geli maulanacha dari,

  • सागर गाटे

    तुम्ही दोघ भांडतच बसा…..कधी अक्कल यायची तुम्हा दोघांना देव जाणो

close