दिलदार धोनीने पाकिस्तानी चाहत्याला दिले तिकीट

April 6, 2014 8:41 PM0 commentsViews: 5280

Image img_145522_dhoni2345_240x180.jpg06 एप्रिल :  भारताचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याने पाकिस्तानमधील आपल्या चाहत्याला आज श्रीलंकेविरुद्ध होणार्‍या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले आहे. धोनीच्या या दिलदारपणाचे पाकिस्तानी चाहत्याने भरभरुन कौतुक केले आहे.

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश पारंपारिक प्रतिस्पर्धी असले, तरी धोनीने खेळाच्या बाबतीत कोणताही द्वेष न ठेवता या चाहत्याला भारताचा सामना पाहता यावा, याची सोय केली आहे. धोनीचा पहिल्यापासून चाहता असलेल्या मोहम्मद बशीर याच्यासाठी धोनीने शनिवारी विशेष तिकीटाची सोय केली. तो शिकागोहून बांगलादेशमध्ये भारताचे समर्थन करण्यासाठी आला आहे.

टी – 20 विश्वचषकात क्रिकेट स्पर्धेतून पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच बाहेर गेला आहे. बशीर यांनी धोनीशी सामना पाहण्याबाबत चर्चा केल्यानंतर धोनीने रमेश माने यांना सांगून त्याच्या तिकीटाची सोय केली.

‘त्यांनी (धोनीने) माने काका नामक व्यक्तीला बोलवून माझ्यासाठी विशेष पासची सोय करुन द्यायला सांगितले’ असे बशीर सांगतात.

धोनीच्या या दिलदारवृत्तीवर बशीर हे भलतेच खुश झाले असून मी पाकिस्तान संघाचा कट्टर समर्थक असलो तरी आज मी भारतीय संघाचा पाठिराखा म्हणून स्टेडियममध्ये येईन असे बशीर यांनी स्पष्ट केले. बशीर हे हॉटेल व्यावसायिक असून शिकागोत ते गरीब नवाज हे रेस्टॉरंट चालवतात.

close