आघाडीविषयी चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

March 26, 2009 8:28 AM0 commentsViews:

26 मार्चनिवडणुकीनंतर काँग्रेेसने कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची याबाबत काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्यात. या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत प्रणव मुखर्जी आणि दिग्विजय सिंग हजर राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर आघाडी करावी अशी मागणी राष्ट्रवादी आणि राजदने केली होती. त्याला काँग्रेसने नकार दिला होता, त्यामुळे हे पक्ष अगोदरच दुरावले. त्यातच त्या त्या राज्यातही जागावाटपाच्या मुद्यावरुन काँग्रेसचे जवळचे मित्र असलेले समाजवादी पार्टी, राजद, लोकजनशक्ती पार्टी आणि डावे पक्ष युपीएमधून बाहेर पडलेत. आणि आता तर युपीए सरकारमध्ये केंद्रीयमंत्री असलेल्या अंबुमणी रामदॉस यांचा पीएमके (पट्टाली मक्कलकाठ) पक्षही काँग्रेसची साथ सोडून जयललितांशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काँग्रेस आता नव्या मित्रांचा शोध घेतंय. वरूण गांधींच्या मुद्दयावरून भाजपशी मतभेद असणार्‍या नितिशकुमार यांच्यासाठी प्रणव मुखर्जी आणि दिग्विजय सिंग यांनी प्रयत्न सुरू केलेत. तसंच निवडणुक ांनंतर कोणत्या पक्षांचं सहाय्य घ्यावं याचा विचारहीकाँग्रेसने सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणजे सोनिया गांधींनी ही बैठक बोलावलीय. या विशेष बैठकीत निवडणुकीनंतरच्या सर्वच शक्यतांवर चर्चा होईल असं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे एनडीएमध्ये फूट पाडून संयुक्त जनता दलाला आपल्यासोबत खेचून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे.

close