भाजपचा संकल्पनामा थांबवा, काँग्रेसची आयोगाकडे धाव

April 7, 2014 6:06 PM0 commentsViews: 2284

bjp vs congress07 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाच्या दिवशी भाजपने आपला संकल्पनामा जाहीर केला. पण भाजपच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने याबाबत निवडणूक आयोगाकडे धाव घेतलीय.

सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जाहीरनामा हा मतदानापूर्वी प्रसिद्ध व्हायला हवा, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे जाहीरनामा प्रकाशित करण्यापासून भाजपला रोखावं, अशी मागणी काँग्रेसनं केली. जाहीरनाम्यात केलेल्या राममंदिराच्या आश्वासनालाही काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे.

भाजपने ‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देत प्रगती आणि आर्थिक मुद्यांवर भर देत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. महागाई काबूत आणणं आणि कर प्रणालीत बदल करणे याला आपलं प्राधान्य असेल असं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय. मल्टी ब्रॅण्ड रिटेलमधली गुंतवणूक वगळता इतर, विशेषतः रोजगार निर्मितीला वाव देणार्‍या क्षेत्रातल्या एफडीआयला भाजपचा पाठिंबा असेल. काळा पैसा भारतात परत आणणं, धोरण लकवा हाताळणं याही मुद्द्यांवर भाजपने भर दिलाय.

सोबतच आपलं सरकार आल्यास जीएसटी कर प्रणाली लागू करण्याचं आश्वासन भाजपनं दिलंय. आर्थिक धोरणासोबतच खास भाजपचे मुद्देही मांडण्यात आलेत. घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिर बांधण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, कलम 370 बद्दल सगळ्यांशी चर्चा करणार असं आश्वासन देण्यात आलंय. काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन, त्यांना जमीन आणि सुरक्षा देण्याच्या मुद्याचाही उल्लेख जाहीरनाम्यात आहे.

त्याचप्रमाणे मदरशांचं आधुनिकीकरण करण्याचं आणि उर्दूच्या संवर्धनाचंही आश्वासन देण्यात आलं. ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’अभियान, संसद आणि विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षणाचा मुद्दाही यात आहे. मात्र आज पहिल्या टप्प्यात मतदानाला सुरूवात झालीय. याच दिवशी जाहीरनामा जाहीर केल्यामुळे काँग्रेसने आक्षेप घेतलाय.

close