ग्राऊंड रिपोर्ट :अमरावतीच्या आखाड्यात तिरंगी लढत

April 7, 2014 8:59 PM0 commentsViews: 3967

आशिष जाधव, अमरावती

07 एप्रिल : अमरावती राखीव मतदारसंघातली लढत लक्षवेधी झालीये. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसप यांच्यात इथं तिरंगी लढत होतेय. राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षात नाराजी असल्याने इथं अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

नवनीत राणा.. दक्षिणेत गाजलेली अभिनेत्री.. अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता त्यांचं नाव राज्यातही गाजतंय. अमरावती हा खरं तर राखीव मतदारसंघ..या मतदारसंघात दलित नेतृत्वाला पुढे आणण्याऐवजी राष्ट्रवादीकडून नवनीत राणांना उमेदवारी दिली. त्यामुळे संजय खोडकेंनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी बसपच्या गुणवंत देवपारेंना उघड-उघड पाठिंबा दिला. एवढंच नाही तर खोडके देवपारेंचे पोल मॅनेजरही बनले आहेत.

स्थानिक पातळीवर पक्षात पसरलेल्या अस्वस्थतेमुळे अमरावतीत पक्ष सावरण्यासाठी खुद्द शरद पवार आणि अजित पवारांनीच उमेदवार नवनीत राणांच्या निवडणूक व्यवस्थापनाची सूत्रं हाती घेतली आहे. त्यामुळे नवनीत राणांचा प्रचार सध्या धडाक्यात सुरू आहे.

विदर्भाबाहेरच्या आनंदराव अडसुळांना शिवसेनेनं आधी बुलढाणा आणि नंतर अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर पाठवलं. आता अडसूळ दुसर्‍यांना अमरावतीतून आपलं नशीब आजमावत आहेत. अडसुळांना पाठिंबा मिळावा आणि स्थानिक पातळीवरची नाराजी दूर व्हावी यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला.

शिवसेनेच्या पारंपरिक मतांची ताकद ओळखून राष्ट्रवादीनं कुणबी मतांबरोबरच मुस्लिम आणि दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केलाय. तर बसपच्या धडाक्यामुळे दलित मतांचं ध्रुवीकरण होतंय. रिपाईचे राजेंद्र गवई आणि आपच्या भावना वासनिक यांची उमेदवारी केवळ बॅनर्सवर दिसतेय. म्हणूनच ही लढत तिरंगी आणि रंगतदार बनली आहे.

close