विदर्भात प्रचाराच्या तोफा थंडावल्या,10 एप्रिलला मतदान

April 8, 2014 5:57 PM0 commentsViews: 1094

tw45vidbharbha_election08 एप्रिल : विदर्भामध्ये लोकसभेच्या 10 जागांसाठी गुरुवारी 10 एप्रिलला मतदान होतंय. त्यासाठी प्रचाराची मुदत आज (मंगळवारी) संध्याकाळी 5 वाजता संपलीय. विदर्भातल्या 10 मतदारसंघांपैकी नागपूरच्या लढतीनं अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.

इथं काँग्रेसचे विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार, भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांच्यात तिरंगी लढत होतेय. तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता, जीवाचं रान करत प्रमुख उमेदवारांनी प्रचार केलाय.

नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या दहा मतदारसंघांसाठी 201 उमेदवार रिंगणात आहेत. नितीन गडकरी, विलास मुत्तेमवार, हंसराज अहिर, प्रफुल्ल पटेल, आनंदराव अडसूळ, मुकुल वासनिक, भावना गवळी, वामनराव चटप, अंजली दमानिया यांसारखे नेते नशीब आजमावत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पक्षांकडून झाला असला तरी, उमेदवारांशी संबंधित स्थानिक प्रश्नांना घेऊनच प्रचार झाला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं उमेदवार आता मतदारांशी थेट भेटण्याकडे लक्ष देत आहेत.

close