आयोगाच्या इशार्‍यानंतर ममतादीदींचा विरोध मावळला

April 8, 2014 7:49 PM0 commentsViews: 547

57665_Mamata-Banerjee08 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये अधिकार्‍यांच्या बदली प्रकरणी निवडणूक आयोगाच्या इशार्‍यानंतर ममता बॅनर्जी यांनी तलवार म्यान करत आता मवाळ भूमिका घेतलीय. त्यांनी निवडणूक आयोगाला नवीन पत्र लिहून प्रत्येक अधिकार्‍यासाठी 3 पर्यायी नावं सुचवली आहे.

6 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाने ममतांना दुपारी अडीच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. यानंतर ममतांची भूमिका मवाळ झाल्याचं दिसतंय. याआधी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव संजय मित्रा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. या बदल्या केल्या तर प्रशासकीय अडचणी येऊ शकतात, असं त्यांनी या पत्रात म्हटलं होतं.

पण आपण मुख्यमंत्री असेपर्यंत या 6 अधिकार्‍यांची बदली होऊ देणार नाही, त्यासाठी तुरुंगात जावं लागलं, तरी चालेल, असा पवित्रा ममतांनी घेतला होता. पण निवडणूक आयोगांने थेट ममतादीदींना इशारा दिला.

या आदेशांचं पालन करण्यात आलं नाही, तर पश्चिम बंगालमधल्या निवडणुका रद्द करण्याचे अधिकार आयोगाकडे असल्याचं आयोगाने ममतांना बजावलं होतं. अखेर ममतांनी आपली भूमिका मवाळ केलीय.

close