आता बोला, या गावात दोनदा करतात मतदान !

April 8, 2014 10:05 PM0 commentsViews: 1257

महेश तिवारी, चंद्रपूर

08 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोटावरची शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा सल्ला नवी मुंबईतल्या सभेत दिला. त्यावरून वादळही
उठलं. पण पवारांचं हे वाक्य चंद्रपुरात प्रत्यक्षात येतंय. चंद्रपूरातल्या 14 गावांमधले स्थानिक खरोखरच दोनदा मतदान करतात. ऐकायला नवल वाटत असलं तरी हा प्रकार गेल्या काही वर्षांपासनं सर्रास सुरू आहे.

हे पंडित कांबळेंचं महाराष्ट्रातलं व्होटर आयडी कार्ड..आणि हे त्यांचंच आंध्रचं दिलेलं व्होटर आयडी कार्ड..केवळ पंडित कांबळेच नाही तर चंद्रपुरामधल्या जिवती तालुक्यातल्या 14 गावांमधल्या एकूण 5 हजार मतदारांकडे अशी दोन व्होटर आयडी कार्डस् आहेत.

1996 पासून चंद्रपुरातल्या जिवती तालुक्यातल्या या गावांवर आंध्रनेही दावा सांगायला सुरूवात केली. म्हणूनच या गावांमध्ये मराठी आणि तेलगु अशा दोन्ही माध्यमांच्या शाळा आहेत. या गावांत दोन ग्राम पंचायती, दोन सरपंच, दोन तलाठी आहेत. एवढंच नाही तर या
गावकर्‍यांकडे दोन्ही राज्यांनी दिलेली रेशनकार्डस् सुद्धा दिली आहेत.

या दुहेरी मतदानाबद्दल आयबीएन लोकमतने निवडणूक अधिकार्‍यांकडेही विचारणा केली. मात्र त्यांनी यासंदर्भात काहीही बोलायला नकार दिलाय. आता हे गावकरी 10 एप्रिलला चंद्रपूरसाठी तर 30 एप्रिलला आंध्रच्या आदिलाबादसाठी मतदान करणार आहेत. या सगळ्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या आणि भारतीय लोकशाहीच्या पारदर्शी कारभाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

close