…असे उमेदवार येता दारी !

April 8, 2014 11:28 PM0 commentsViews: 988

स्नेहल बनसोडे, मुंबई

08 एप्रिल : 16 व्या लोकसभेची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांचा निवडणुकीतील सहभाग.फक्त दोन वर्षांच्या आम आदमी पक्षानं या वेळी असे अनेक उमेदवार मैदानात उतरवले आहे.

जालन्यात आम आदमी पक्षातर्फे उभे आहेत दिलीप म्हस्के. म्हस्केंची कहाणी प्रेरणादायी आहे. एका गरीब दलित कु टुंबात जन्मलेल्या म्हस्केंनी स्वबळावर आयआयटीतून शिक्षण घेतलं. प्रसंगी कचरा वेचून त्यांच्या आईनं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. पीएचडी मिळवून त्यांनी अमेरिकेत आरोग्य सल्लागार म्हणून काम केलं. एवढं सगळं होऊनही त्यांची मातीशी नाळ तुटलेली नाही. अण्णांच्या दिल्लीतल्या आंदोलनांनंतर अमेरिकेतली डॉलर्स मिळवून देणारी नोकरी सोडून ते निवडणूक लढवण्यासाठी भारतात परतलेत.

सलमा कुलकर्णी यांचं वेगळेपण त्यांच्या नावापासूनच सुरू होतं. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास कुलकर्णी यांची कन्या सलमा यांना आम आदमी पक्षाने परभणीतून उमेदवारी दिली आहेत. दलित फाऊंडेशनमध्ये दलित महिलांच्या अन्यायाविरुद्ध सलमा यांनी मोठं काम केलंय. हातानं मैला उचलण्याच्या अमानुष पद्धतीविरोधात विरोधात त्या काम करतात.

याशिवाय महाराष्ट्रात आम आदमी पक्षानं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना निवडणुकीच्या मैदानात आणलंय.

– नाशिक- हजारो कोटींचा सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे विजय पांढरे रिंगणात
– बीड- अभिनेते नंदू माधव गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात
– बारामती- माजी आयपीएस सुरेश खोपडे सुप्रिया सुळेंच्या विरोधात
– रायगडमधून माजी पोलीस सुपरिटेन्डंट डॉ. संजय अपरांती रिंगणात
– मुंबई दक्षिणमधून कार्पोरेट बँकर मीरा संन्याल मैदानात
– अमेरिकेतली नोकरी सोडून आलेले प्रशांत मिश्रा भंडारा- गोंदियामधून मैदानात
– राष्ट्रसेवादलाच्या सुभाष वारेंनाही पुण्यातून तिकीट मिळालंय

आम आदमी पक्षाच्या धोरणांबद्दल आणि कामाच्या पद्धतीबद्दल मतभेद असले, तरी या पक्षानं चांगलं काम करणार्‍या अनेकांना संधी दिलीये हे मानायलाच हवं.

‘आप’चे उमेदवार

  • नाशिक – विजय पांढरे
  • बीड – नंदू माधव
  • बारामती – सुरेश खोपडे
  • रायगड – संजय अपरांती
  • मुंबई दक्षिण – मीरा संन्याल
  • भंडारा-गोंदिया – प्रशांत मिश्रा
  • पुणे – सुभाष वारे

close