पूनम महाजन- राज ठाकरे भेट : नवीन समीकरणांची शक्यता

March 27, 2009 11:19 AM0 commentsViews: 102

27 मार्च भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या तसंच ईशान्य मुंबईतून उमेदवारी नाकारलेल्या पूनम महाजन यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. कृष्णकुंजवर त्यांनी ही भेट घेतली. पूनम यांना भाजपकडून ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे त्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. पण ही राजकीय भेट राजकीय नसून गुढी पाडव्यानिमित्ताने ही भेट घेतल्याचा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. मात्र उभयतांची ही भेट राजकीय आहे की कौटुंबिक, या चर्चेला उधाण आलं आहे. ' ही भेट राजकीय नसून राज ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आले आहे. मी भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहे, असं पूनम महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. ईशान्य मुंबईत पूनम महाजन यांना उमेदवारी मिळणार, असं गोपीनाथ मुंडेंना वाटत असताना ऐनवेळी किरीट सोमय्यांचं नाव जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये खूपच नाराजी पसरली आहे. या आधी प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनाही राज्यसभेतून भाजपची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळेही महाजन कुटुंबियांमध्ये नाराजी पसरली होती.

close