केजरीवालांची गांधीगिरी, ‘त्या’ रिक्षाचालकाची घेतली भेट

April 9, 2014 2:16 PM0 commentsViews: 1890

kejriwal with lali09 एप्रिल : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील रोड शो दरम्यान त्यांना थप्पड  लगावणार्‍या रिक्षाचालकाची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. लाली असं त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

केजरीवालांनी बुधवारी सकाळी त्यांच्या घरी जाऊन त्याची विचारपूस केली. या भेटीत लालीनं केजरीवाल यांची माफी मागितली. हे कृत्य करण्यामागे राजकीय हेतू नव्हता असा दावाही त्यानी केला.

केजरीवाल सरकारने रिक्षाचालकांना दिलेली आश्‍वासने न पाळल्याच्या रागातून लालीने मंगळवारी केजरीवाल यांना थप्पड मारली होती. या हल्ल्यात केजरीवाल यांच्या डोळ्याला किरकोळ जखम झाली.

दरम्यान, आपण त्याला माफ केलं असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. तर राजकारणात हिंसेला जागा नाही असंही ते म्हणाले.

चार दिवसांत केजरीवाल यांच्यावर झालेला हा सलग दुसरा हल्ला आहे. दिल्लीतील दक्षिणपुरी भागात प्रचार करताना १९ वर्षीय युवकाने केजरीवाल यांना थप्पड मारली होती. त्यापूर्वी हरियाणात एका युवकाने त्यांच्यावर हल्ला केला होता, तर वाराणशीत केजरीवाल यांच्यावर शाई फेकली होती.

close