काँग्रेसचा नारा ‘हर हाथ लूट, हर ओंठ झूठ’-मोदी

April 9, 2014 6:41 PM0 commentsViews: 1360

latur_modi_speech09 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज (बुधवारी) महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. सोलापूर,सांगली, लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेसाठी मोदींनी हजेरी लावली. यावेळी मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केलीय.

मोदींनी सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासासाठी सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केलीय. काँग्रेसचा नारा केवळ ‘हर हाथ लूट, हर ओंठ झूठ’ हाच असून काँग्रेसशी आता नातं तोडा असं आवाहन मोदी यांनी केलं.

भाजप शेतकर्‍यांच्या पाठिशी असून पाण्यासाठी विविध योजना आणणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

‘पक्षातच महिला सुरक्षित नाही तर देशातील महिलांना काय सुरक्षा पुरवणार’

दिल्लीतील काँग्रेस पदाधिकार्‍यांने केलेलं तंदुर कांड ते लातुरमधील काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा उल्लेख करत काँग्रसमध्येच महिला सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी केली. पक्षातच महिला सुरक्षित नसतील तर देशातील महिलांना काँग्रेसचं सरकार कशी सुरक्षा देवू शकेल असा सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थित केला. ते लातूरच्या सभेत बोलत होते.

‘शिंदेनी केवळ गांधी घराण्याची हांजी-हांजी केली’

तसंच काँग्रेसला आणि सुशीलकुमार शिंदेंना लोकशाहीशी काही देणं-घेणं नाही, केवळ गांधी कुटुंबीयांना खुश करणं माहित आहे अशी टीकाही नरेंद्र मोदींनी सोलापुरात केली.  तसंच महाराष्ट्रातल्या एलबीटीवर बोलताना, एलबीटी म्हणजे ‘लूटो-बाटो-टॅक्स’ असं मोदींनी म्हटलंय. तुम्ही काँग्रेसला 60 वर्ष दिली, मला 60 महिने द्या असं आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केलं. आपल्या देशाचं सरकार दुबळं आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला खातं खोलू देऊ नका असंही मोही म्हणाले.

close