अकोल्यात धोत्रेंची परीक्षा, काँग्रेसची कडवी टक्कर !

April 9, 2014 8:38 PM0 commentsViews: 798

568_AKOLA_GROUND_REPORTदीपक सुर्वेसह आशिष जाधव,अकोला

04 एप्रिल : सलग दोनदा लोकसभेवर निवडून गेलेले अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे तिसर्‍यांदा आपलं नशीब आजमवत आहेत. पण यंदा काँग्रेसनं अनपेक्षितपणे हिदायत पटेल यांच्या रुपात मुस्लिम उमेदवार देऊन कडवं आव्हान उभं केलंय. त्यामुळे कुणबी-पाटील समाजाच्या मतांचं प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातील लढत चुरशीची बनली आहे.

विदर्भातलं अकोला हे उद्योगधंदा असलेलं मोठं शहर. पण त्यामानाने जिल्ह्यातला उर्वरित भाग मात्र अविकसित आहे. इथे.. शेती-वाडी, जमीन-जुमला असलेल्या कुणबी पाटील समाजाची साडेचार लाख मतं, खासदार ठरवण्यात यशस्वी होतात. या पूर्वी बहुतेकवेळा काँग्रेस आणि भाजपकडून कुणबी उमेदवार दिले गेले. कुणबी समाजातले भाजपचे संजय धोत्रे सलग दोन वेळा इथून निवडून गेलेत.

कुणबी मतांच्या खालोखाल अकोला जिल्ह्यात माळी मतांचं प्राबल्य आहे. त्यामुळे कुणबी नाही तर माळी उमेदवार द्यावा अशी भूमिका प्रदेश काँग्रेसनं घेतली होती. पण अल्पसंख्यांक मतांची ताकद ओळखून काँग्रेसने हिदायत पटेल यांची उमेदवारी जाहीर केली.

अकोल्यातल्या या लढतीचा निर्णायक घटक म्हणजे भारिप बहुजन संघाच्या प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी. जिल्हा परिषद आणि महापालिकेत सत्ता असल्यानं प्रकाश आंबेडकरांकडे 42 टक्के बिगर हिंदू मतांपैकी किती मतं जातात, यावर बरंच काही अवलंबून आहे.

आजवर कुणबी पाटील समाज खासदार ठरवत असे, पण मोदी लाटेच्या धुंदीत 22 टक्के मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मतं काँग्रेसकडे वळू
शकतात असा अंदाज वर्तवला जातो.त्यातच कधी नव्हे ते सेनेचे पदाधिकार्‍यांमध्ये सुद्धा नाराजी असल्यानं धोत्रेंसाठी ही निवडणूक अवघड बनलीये.

close