एका मतासाठी जवानांचा जीव पणाला !

April 10, 2014 8:52 PM0 commentsViews: 820

महेश तिवारी, गडचिरोली

10 एप्रिल : मतदान पार पाडणं ही इथं एक थरारक प्रक्रिया असते मतदानासाठी पथक निघणे, मतदान केंद्रावर पोचून मतदान सुरळितपणे पार पडणं, त्यानंतर सुरक्षित परत येणं या प्रकारात प्रशासकीय यंत्रणेची तब्बल 5 दिवस कसोटी लागते. प्रशासनातल्या कर्मचार्‍यांपासून सुरक्षा दलाच्या जवानांचा जीव धोक्यात असतो.

2004 साली निवडणुकीचं साहित्य हेलिकॉप्टरमध्ये ठेवलं जात असताना माओवाद्यांचा गोळीबार सुरू झाला होता. हे ठिकाण होतं छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या बिनागुडाचं. तरीही पोलिसांनी जीव धोक्यात घालून या ठिकाणी निवडणूक सुरक्षित पार पाडली. निवडणुकीवर बहिष्काराचं आवाहन तर माओवादी नेहमीच करतात. गडचिरोली जिल्ह्यात 60 टक्के मतदान केंद्रावर पथकाला पायी जावे लागते. सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन तब्बल 20 किलोमीटरचा पायी प्रवास असतो. निवडणुकीच्या दोन दिवस आधी हा प्रवास सुरू होतो. माओवाद्यांकडून यावेळी अनेक ठिकाणी गोळीबार, भूसुरुंग स्फोट करून पथकावर हल्ला केला जातो. काही ठिकाणी तर, 50 मतदार असले तरी हेलिकॉप्टरचा वापर करून पथकाला नेलं जातं.

बिनागुडा परिसरात माओवाद्यांचा प्रभाव असल्याने 2003 पर्यंत इथं मतदानच झालं नव्हतं. मात्र 2004 मध्ये पोलीस अधीक्षक राजवर्धन यांच्या प्रयत्नाने पहिल्यांदा नागरिकांनी मतदान केले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीतही तब्बल 13 ठिकाणी माओवाद्यांनी गोळीबार केला होता.

अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोचण्यासाठी तालुका मुख्यालयातून पथक रात्रीच मुक्कामाला निघतं. सकाळी बेस कॅम्प ते मतदान केंद्रावर जाणं आणि परत सुरक्षित मतदान पूर्ण करुन बेस कॅम्प आणि तिथून तालुका मुख्यालयात परत येणं या प्रकारात पाच दिवस जातात. या काळात अशी मतदान केंद्र आहेत की, जिथं मोबाईल किंवा इतर कोणतीच संपर्क यंत्रणा नाहीये. जिल्ह्यात अशी 400 संवेदनशील मतदान कें द्रं आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने 33 मतदान केंद्र सुरक्षितस्थळी हलविण्यात आलीयत.

भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा, कोरची या भागांत ज्यांची निवडणुकीची ड्युटी लागते, ते कर्माचारी सुरक्षित घरी परतेपर्यंत त्यांचे कुटुंबीय देखील चिंतेत असतात.

close