तुम्ही जिल्ह्यात आघाडीचा धर्म पाळा, आम्ही राज्यात पाळू – राणे

April 11, 2014 11:19 AM0 commentsViews: 3220

Image img_182812_rane34_240x180.jpg11 एप्रिल :  सिंधुदुर्गातल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे नारायण राणेंचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही जिल्ह्यात आघाडीचा धर्म पाळा, आम्ही राज्यात आघाडीचा धर्म पाळू असं म्हणत नारायण राणे आता बॅकफूटवर गेले आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांबद्दल कोणाताही राग नसल्याचं त्यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी जिल्ह्यात आघाडीचा धर्म पाळण्याचीही विनंती केली आहे.

कोकणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधला वाद मिटवण्यासाठी आता खुद्द शरद पवारच पुढाकार घेतायत. सिंधुदुर्गात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा प्रचार करणार नाही या भूमिकेवर राष्ट्रवादीचे स्थानिक नेते ठाम आहेत. तर आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या 400 पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे जिल्ह्याध्यक्षांकडे सोपवले आहेत. हा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांना पवारांनी भेटीला बोलावलं आहे.

काल जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांच मन वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला यश आलं नाही, त्यामुळे आजच्या पवार-केसरकर भेटीकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. या भेटीनंतरच आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं केसरकरांनी IBN लोकमतशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज काँग्रेसचे खासदार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये सभा घेणार आहेत. या सभेकडे सिंधुदुर्गातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. काल दीपक केसरकर आणि पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांची भेट निष्फळ ठरल्याचीही चर्चा आहे.

close