मोदींच्या सभेतलं मनोरंजन!

April 11, 2014 2:26 PM0 commentsViews: 636

प्रवीण सपकाळ, सोलापूर

11  एप्रिल :  सध्या देशभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. आपल्या पक्षाला आणि उमेदवारांना मतं मिळावीत यासाठी नेते मंडळी भलीमोठी भाषणंही देत आहेत. या भाषणांमध्ये इतिहास, साहित्यापासून सगळ्याचे दाखले देत मतदारांना आकर्षित करून घेण्याचा सगळेच उमेदवार प्रयत्न करत आहेत. मात्र हा भाषणाचा कागद जर ऐन भाषण सुरू असताना हातातून उडाला तर… असाच प्रकार सोलापूरमध्ये नरेंद्र मोदींच्या सभेतही घडला आहे.

नरेंद्र मोदींच्या सभांना देशभरात मोठी गर्दी जमतेय. त्यांची भाषणाची शैली आणि त्यातली आक्रमकता उपस्थितांना आवडतेय. त्यामुळे या भाषणांमध्ये चुकीचे संदर्भ आले तरी त्याकडे दुर्लक्षही केलं जातं आहे अर्थातच, मोदी ही भाषणं आयत्या वेळी, सुचेल तशी देत नाहीत. त्यासाठी त्यांची पूर्ण तयारी असते. पण सोलापुरातल्या भाषणात त्यांच्या हातातला भाषणाचा कागदच उडाला आणि त्यांची धांदल उडाली.

अशा सभांच्या निमित्ताने अनेक उपस्थित सेंटर ऑफ ऍट्रॅक्शन बनण्याचा प्रयत्नही करतात. मोदींच्या याच सोलापुरातल्या सभेमध्ये एका आजोबांनी भर सभेत दंडबैठका काढून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिलं. तर याच सभेत एक चहावाला मोदींना पाठिंबा देण्यासाठी चक्क चहाची किटली घेऊन आला होता. अर्थाच या चहावाल्याने मीडियाचं लक्ष वेधून घेतलं नसतं तरच नवल.. तासन् तास सभास्थळी नेत्यांची वाट पाहणार्‍या कार्यकर्त्यांना असे मनोरंजनाचे क्षण या निमित्ताने सध्या अनुभवायला मिळतायत.

close