फिल्म रिव्ह्यु : ‘भूतनाथ रिटर्न्स’

April 11, 2014 9:46 PM0 commentsViews: 1446

अमोल परचुरे, समीक्षक

एखादा सिनेमा हिट होणार की नाही हे तो कधी रिलीज होतोय, त्यावरही थोड्याफार प्रमाणात अवलंबून असतं. ‘भूतनाथ रिटर्न्स’चं टायमिंग एकदम परफेक्ट आहे. देशभरात निवडणुकांचं वातावरण आहे, आणि या सिनेमात तर भूतच निवडणुकीला उभं राहिलंय, त्यामुळे वास्तवातला निवडणुकांचा माहौल सिनेमात चांगला कॅच झालाय. पण सिनेमाचा प्रॉब्लेम म्हणजे इंटरव्हलआधी हा सिनेमा लहान मुलांचा आहे असं वाटतं, आणि इंटरव्हलनंतर तो निवडणूक, त्याचा प्रचार, त्यातल्या कायदेशीर गोष्टी, सामान्य जनतेला जागवण्याचा भुताचा प्रयत्न असा सगळा राजकीय आणि सामाजिक होऊन जातो. जिवंत नसलेल्या माणसानं जनतेच्या मेलेल्या भावना जागवणं हा विचार ब्लॅक कॉमेडीमधून आणखी प्रभावीपणे मांडता आला असता, पण एक चांगला मजेशीर ट्रॅक सुरू असताना, अमिताभ बच्चन, बोमन इराणी, छोटा पार्थ भालेराव यांचा भन्नाट अभिनय सुरू असताना सिनेमाचा ट्रॅक बदलतो आणि इंटरव्हलनंतर सिनेमा रेंगाळत राहतो.

काय आहे स्टोरी ?
sdfg_Bachchan-Parth-Bhalerao
‘भूतनाथ रिटर्न्स’ हा सिक्वेल आहे 2008 साली आलेल्या ‘भूतनाथ’चा. कैलाशनाथ नावाचं भूत आता दुसर्‍या भागात पृथ्वीवरुन परत भूत लोकी येतं. तिथे सगळी भुतं आता पुढच्या जन्माची वाट बघतायत. ‘हॅरी पॉटर’ सिनेमांमध्ये असतं तसं एक गाव इथे दिसतं, पण सगळी भुतं कैलाशनाथला हसत असतात, कारण पहिल्या भागात एका लहान मुलाला तो घाबरवू शकलेला नसतो. ही कमतरता भरुन काढता यावी यासाठी कैलाशनाथ पुन्हा पृथ्वीवर जायची परवानगी मागतो आणि असा विश्वास देतो की, यावेळी तो नक्की आठ-दहा मुलांना घाबरवेल. त्याला पृथ्वीवर यायची परवानगी मिळते, इतर मुलं त्याला बघू शकत नाहीत, पण एक मुलगा ज्याचं नाव असतं अक्रोड, तो कैलाशनाथला बघू शकत असतो, त्यांच्यात दोस्ती होते आणि मग सगळं प्रकरण निवडणुकीपर्यंत जातं, अशी साधारण गोष्ट आहे.

नवीन काय ?
7big_b_bhootnath
हा सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो ज्या थिएटरमध्ये पाहिला, तिथे मोठ्या संख्येनं लहान मुलं आलेली होती. इंटरव्हलपर्यंत भुताच्या गंमती-जमती, भुताच्या करामती, विनोदी डायलॉग्ज यामुळे त्यांना मजा येत होती, पण इंटरव्हलनंतर एकाही मुलाचा आवाज नव्हता. इंटरव्हलनंतर भुतनाथची भाषणबाजी, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा त्याचा लढा या सगळ्या गोष्टी त्यांच्या पालकांसाठी नवीन नव्हत्या, आणि सादरीकरणात सुद्धा नावीन्य नव्हतं, त्यामुळे ना धड लहान मुलांचा सिनेमा, ना धड चांगली फॅमिली फिल्म अशी भुतनाथ रिटर्न्सची अवस्था झालीये. पण त्याशिवाय जमून आलेली चांगली गोष्ट म्हणजे आर्ट डिरेक्शन.. 90 टक्के सिनेमा धारावीत घडतो आणि यासाठी जो सेट बनवलाय तो अगदी हुबेहूब धारावीसारखाच आहे. बाकी गाणी फार लक्षात राहणारी नाहीत, ‘अपवाद पार्टी तो बनती है’ या गाण्याचा. पण याशिवाय सिनेमाचा विषय बघता चटपटीत, चुरचुरीत संवादांची गरज होती असंही जाणवतं.

परफॉर्मन्स
dew8yoyo hani singh
अभिनयात कमाल केलीये अर्थातच अमिताभ बच्चन, बोमन इराणी आणि छोट्या पार्थ भालेरावने.. सिनेमा कसाही असला तरी अमिताभ यांचा अभिनय खराखुरा आणि सहजसुंदर असतो, भूतनाथ रिटर्न्समध्येसुद्धा त्यांनी भिती न वाटणार्‍या भुताची भूमिका मस्त केलीये. पार्थ भालेराव या मुलाचं खरंच कौतुक करावं लागेल. अमिताभसारख्या महानायकासमोर उभं राहणं, अभिनय करणं आणि मुख्य म्हणजे अमिताभ आपल्याच वयाचा असल्यासारखं त्याच्याशी वागणं हे पार्थने अगदी सहज जमवलंय. बोमन इराणी तर त्याच्या एंट्रीपासूनच गुंड नेता वाटत राहतो. छोट्या छोट्या भूमिकांमध्ये जे कलाकार आहेत त्यांनीही मस्तच काम केलेलं आहे. उषा जाधव, उषा नाडकर्णी, अनंत जोग, संजय मिश्रा यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

रेटिंग 100 पैकी 60

close