राष्ट्रवादीचे दीपक केसरकर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

April 13, 2014 2:05 PM0 commentsViews: 3213
deepak kesarkar13 एप्रिल :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीनंतर आज आमदार दीपक केसरकर यांनी आमदारकीचा राजीनामा  दिला आहे. केसरकरांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नारायण राणेंसोबत सुरू असलेला वाद उफाळून आला आहे. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे संयुक्त सभा घेणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी या जाहीर सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व राज्याचं लक्ष आता या सभेकडे लागलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्गातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीमधील तिढा कायम होता. आज त्यामध्ये आणखी भर पडली असून, शरद पवार यांच्या सभेपूर्वीच केसरकरांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपला राजीनामा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. दहशतवादाला विरोध करत आपण व्यक्तिगत हा निर्णय घेतल्याचे, केसरकरांनी म्हटले आहे. मला शरद पवारांविषयी आदर असून माझ्यामुळे राष्ट्रवादीला कोणाची बोलणी ऐकावी लागू नये यासाठी मी राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी नीलेश राणेंचा प्रचार करण्यास दिला होता. काही दिवसांपूर्वी राणेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या सुमारे ४०० स्थानिक पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिला होता. राष्ट्रवादीच्या नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पवार आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी केले मात्र यात त्यांना अपयश आल्याचे दिसते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close