अंजली वाघमारेच कसाबची केस लढणार – गृहमंत्री

March 31, 2009 5:44 AM0 commentsViews: 2

31 मार्च, मुंबई उदय जाधव मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी अजमल कसाबची केस वकील अंजली वाघमारेच लढतील आणि त्यांना पूर्णपणे सुरक्षा दिली जाईल, असं गृहमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वकील अंजली वाघमारे यांच्या घरावर शिवसैनिकांनी काल सोमवारी रात्री निदर्शनं केली. यानंतर अंजली वाघमारे यांनी कसाबची केस लढणार नाही असं शिवसैनिकांना लिहून दिलं. मात्र सुरक्षेची हमी दिल्यानंतर अंजली वाघमारेंनी पुन्हा केस लढणार असल्याचं मान्य केल्याचा दावा गृहमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. वकील अंजली वाघमारे यांनी वकीलपत्र मागे घ्यावं म्हणून शिवसैनिकांच्या जमवाने त्यांच्या वरळी इथल्या घरासमोर निदर्शनं केली. अनेक निरपराधांचा जीव घेणार्‍या कसाबचं वकीलपत्र का घेतलं असा सवाल या जमावाने केला. यावेळी ऍड. वाघमारे यांनी ' मी ही केस लढवणार नाही, असं लेखी आश्वासन शिवसैनिकांना दिलं. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका नगरसेवकाचा समावेश आहे. कसाबला वकील मिळत नसताना हायकोर्टानं अंजली वाघमारेंची सोमवारी नियुक्ती केली होती. मुंबई हल्ल्यासारख्या खटल्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं असताना शिवसेनेच्या या कृतीमुळे भारताच्या न्याय आणि कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

close