राणेंची गुर्मी जनताच उतरवेल-केसरकर

April 14, 2014 10:52 PM0 commentsViews: 2487

14 एप्रिल : नारायण राणेंशी अजिबात वैर नाही, ना निलेश राणेंशी. वैर आहे ते कार्यपद्धतीशी. राणेंनी ज्या पद्धतीने काम केलंय ते अत्यंत चुकीचं होतं. ज्यांनी विरोध केला त्यांची कार्यालय फोडली गेली. त्यामुळे त्यांच्या या वृत्तीचा पराभव झाला पाहिजे. राणेंची गुर्मी उतरली पाहिजे आणि ही जनताच उतरवेल अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे बंडखोर नेते दीपक केसरकर यांनी केली. तसंच आम्ही विरोधात भूमिका घेतल्यामुळे राणेंच्या समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी मिळत आहे असंही केसरकर यांनी सांगितलं. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत केसरकर यांनी सडेतोड भूमिका मांडली. तसंच शरद पवार यांची राजकीय अपिहार्यता असल्यामुळे त्यांनी आघाडीचा धर्म पाळा असा सल्ला दिला. यामुळेच पवारांनी सांगितलं म्हणून आपण निवडणूक लढवली नाही अन्यथा निवडणुकीला उभं राहण्याची इच्छा होती आणि आपण निवडून ही आलो असतो असंही केसरकर यांनी सांगितलं. तसंच रावणाला मारण्यासाठी धनुष्यबाणाचा रामाने वापर केला होता. त्यामुळे लोकांना माहिती आहे समोर राक्षस आहे की रावण आहे. हे लोकं ठरवतील असंही केसरकर म्हणाले. दरम्यान, दुपारी सावंतवाडीमध्ये झालेल्या मेळाव्यात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी राणेंना या निवडणुकीत धडा शिकवण्याची शपथ घेतली आणि घड्याळाची मतं धनुष्यबाणाला देण्याचा चंग बांधला. त्यामुळे नारायण राणेंच्या अडचणीत आणखी वाढ झालीय.शरद पवारांनी सावंतवाडीत सभा घेऊनही या सभेला उपस्थित नसलेले राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आज केसरकरांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांसह हजर होते. तर, दुसरीकडे उद्या सिंधुदुर्गात मनोहर पर्रीकर,रामदास कदम आणि विनायक मेटेंच्या सभा होत आहेत. या संपूर्ण राड्यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात मात्र आनंदाचं वातावरण आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close