अंजली वाघमारे हल्ला प्रकरणी 9 शिवसैनिकांना पोलीस कोठडी

March 31, 2009 8:56 AM0 commentsViews: 3

31 मार्च, मुंबई वकील अंजली वाघमारे यांच्या वरळीतल्या घरावर हल्ला करणा-या 9 शिवसैनिकांना उद्यापर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी हल्ला करणार्‍या शिवसैनिकांवरच्या कारवाईला पोलिसांनी सुरुवात केली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभ केलं असता, न्यायाधीशींनी त्यांना चांगलच फटकारलं. त्यानंतर उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.वकील अंजली वाघमारे यांनी वकीलपत्र मागे घ्यावं म्हणून शिवसैनिकांच्या जमावाने त्यांच्या वरळी इथल्या घरावर हल्ला केला होता. अनेक निरपराधांचा जीव घेणार्‍या कसाबचं वकीलपत्र का घेतलं असा सवाल या जमावाने केला. यावेळी ऍड. वाघमारे यांनी ' मी ही केस लढवणार नाही, असं लेखी आश्वासन शिवसैनिकांना दिलं होतं. अंजली वाघमारे यांच्याकडून कसाबची केस काढून घेण्याची विनंती पोलीस करू शकतात. मुंबई हल्ल्याशी सबंधीत एका नुकसान भरपाईची केस अंजली वाघमारे लढतायत. तसंच त्यांचे पती पोलीस आहेत.त्यामुळे अंजली वाघमारे यांच्या विश्वासहर्तेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.त्यामुळं ही केस अंजली वाघमारे यांच्याकडून काढून दुसर्‍या वकिलाला देण्याची विनंती पोलीस करू शकतात.दरम्यान काल रात्री त्यांच्या घरी शिवसैनिकांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आलीये. पण कसाबची केस लढण्याबाबत अंजली वाघमारे यांनी अजूनपर्यंत काहीही स्पष्टपणे सांगितलं नसल्याचं, पोलिसांनी म्हटलंय. मुंबई हल्ल्यावरच्या खटल्याचा निकाल काय लागतोय याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हे पाहता कोणत्याही राजकीय पक्षाने केसमध्ये खो घालण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन 26 / 11 च्या केसचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.

close