बडे अधिकारी लोकसभेच्या रिंगणात

April 15, 2014 10:08 AM0 commentsViews: 675

अमेय तिरोडकर, नवी दिल्ली
15  एप्रिल : केंद्रातल्या दोन माजी अधिकार्‍यांच्या दोन पुस्तकांनी यूपीएवर आणि निवडणुकीत बॉम्ब टाकलाय. पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांचं ‘ऍक्सिडेंटल PM’ आणि कोळसा खात्याचे माजी सचिव पी. सी. पारख यांचं पुस्तक सध्या गाजतंय. पण, त्याच वेळी काही अधिकारी पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मुंबई सारख्या शहराचा प्रमुख पोलीस अधिकारी हे पद मिळवणं, अनेक IPS अधिकार्‍यांसाठी स्वप्न असतं. सत्यपाल सिंग यांनी हे पद सोडून भाजप प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, यंदा निवडणुकीत उतरलेले ते एकमेव अधिकारी नाहीत…

राजकीय आखाड्यातले अधिकारी

  • व्ही. के. सिंग, माजी लष्कर प्रमुख

जन्म दाखल्याच्या वादावरून सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात जाणारे लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांना भाजपनं उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमधून तिकीट दिलं.

  • आर. के. सिंग, माजी केंद्रीय गृह सचिव

यूपीए 2च्या काळात गृहखात्यात दबदबा असणारे माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंगसुद्धा भाजपच्या तिकीटावर बिहारमधल्या भोजपूरमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत.

  • आर. एस. पांडे, माजी पेट्रोलियम सचिव

माजी पेट्रोलियम सचिव आर. एस. पांडे यांना भाजपनं बिहारमधल्या वाल्मिकीनगरमधून तिकीट मिळालंय.

  • भागीरथ प्रसाद, माजी प्रधान सचिव

दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना प्रधान सचिव असलेले भागीरथ प्रसाद यांचा मोठा दबदबा होता. ते मध्य प्रदेशातल्या भिंडमधून भाजपचे उमेदवार आहेत.

  • विजय पांढरे, मुख्य अभियंता, मेटा

सिंचन घोटाळ्यावेळी प्रकाश झोतात आलेले विजय पांढरे नाशिकमधून आपचे उमेदवार आहेत.

  • युद्धवीर सिंह, माजी सनदी अधिकारी, हरियाणा

तर युद्धवीर सिंह हिस्सारमधून उमेदवार आहेत.

  • आशिष कुमार, माजी सनदी अधिकारी, बिहार

आशिष कुमार यांना लालूंच्या राष्ट्रीय जनता दलानं नालंदामधून उमेदवारी दिलीय.

यापूर्वीही अनेक माजी अधिकार्‍यांनी राजकारणात आपला ठसा उमटवलाय. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपचे यशवंत सिन्हा, जसवंत सिंग, लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार, अशी ही मोठी यादी आहे. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेले अधिकारी कितपत यशस्वी होतात, हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल.

close