दक्षिण मुंबई मतदारसंघात चौरंगी लढतीमुळे चुरस

April 15, 2014 10:00 AM0 commentsViews: 1915

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई.
15 एप्रिल :  दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघानं नेहमीच काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. पण परिवर्तानाच्या प्रवाहात या मतदारसंघानं प्रसंगी काँग्रेसची साथही सोडलीय. आता मोदी लाटेनं काँग्रेस समोर आव्हान उभं केलय. पण मराठी मतांची विभागणी ही महायुतीसाठी मोठी डोकेदुखी आहे.

ही निवडणूक सोपी नाही, याची मिलिंद देवरांना जाणीव आहे. म्हणूनच ते प्रचाराचा एकही मार्ग सोडत नाहीयेत. मुंबईचा आत्मा असलेल्या या मतदारसंघात यावेळी चौरंगी निवडणूक होतेय. शिवसेनेचे अरविंद सावंत, मनसेचे बाळा नांदगावकर आणि आपच्या मीरा सान्याल यांनी त्यांना कडवं आव्हान दिलंय. या मतदरात संघात प्राबल्य आहे ते जैन मारवाडी आणि गुजराती मतांचं. तसंच इथे मुस्लिम, बोहरी, ख्रिश्चन आणि पारशी मतदारही मोठ्या संख्येने आहेत. या मतांच्या आणि आपण केलेल्या कामाच्या जोरावर आपण निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. तर याच मतांवर बँकर असलेल्या मीरा सान्याल यांचीही भिस्त आहे.

जसे या मतदारसंघात मलबार, मुंबादेवी आणि कुलाबासारख्या उच्चभ्रूंच्या वस्ती आहेत, तशाच इथे वरळी, शिवडी, भायखळा हे मराठीबहुल भागही आहेत. कुलाब्यात कोळी समाजाचीही मतं आहेत. या मराठी मतांसाठी शिवसेना आणि मनसेत चढाओढ आहे. गेल्यावेळी इथून शिवसेना आणि मनसेला प्रत्येकी दीड लाखाच्या घरात मतं मिळाली होती.

दक्षिण मुंबई : 2009 निवडणुकीतलं मतं

  • काँग्रेस (मिलिंद देवरा) – 2 लाख 72 हजार
  • मनसे (बाळा नांदगावकर) – 1लाख59 हजार
  • शिवसेना (मोहन रावले) – 1 लाख 46 हजार

दक्षिण मुंबईतला मतदार 1951 पासून कायमच कौंगेसच्या पाठीशी उभा राहिलाय. पण परिवर्तनाच्या लाटेत इथल्या मतदारांनी परिवर्तनलाच पसंती दिलीय. 1967 मध्ये कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी कौंग्रेसला पराभूत केलं. तर हिंदुत्वाच्या लाटेत 1996 आणि 99 ला ही जागा भाजपाकडे आली.

भाजपाला मानणारा जैन आणि मारवाडी वर्ग आणि शिवसेनेची मराठी मतं एकत्र आल्यास शिवसेनेचा विजय नक्की आहे. पण मराठी आणि मोदी या दोन्ही मुद्द्यांचा वापर करत मनसेही मतं मागत असल्यामुळे निकाल कोणत्या बाजून लागेल, हे सांगता येणं कठीण आहे.

close